नागपूर: बिहार विधानसभेच्या निवडणुकीत एनडीएने मोठा विजय मिळवत तब्बल २०२ जागा जिंकल्या आहेत. तर विरोधकांच्या महाआघाडीला फक्त ३५ जागांवरच समाधान मानावं लागलं. त्यामुळे बिहारच्या निवडणुकीत महाआघाडीला मोठा धक्का बसला. दरम्यान, बिहार निवडणुकीच्या निकालावर राजकीय नेते मंडळी प्रतिक्रिया देत आहेत. या संदर्भात आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. बिहारमध्ये एनडीएच्या एवढ्या जागा जिंकून येण्यामागचं कारण तेथील महिलांना त्यांच्या खात्यात १० हजार रुपये देण्याच्या योजनेचा हा परिणाम असल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे.

यावर नागपूर मध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली. ते म्हणाले, निवडणुकीत जय, पराजय स्वीकारायचा असतो. जो जिता वोही सिकंदर असतो. विरोधकही सत्तेत होते, त्यांनी का नाही अशा योजना आणल्या? आम्ही त्या आणल्या, लोकांना त्या आवडल्या. त्यांनी मतदान दिले. मुंबईत महायुतीचाच महापौर होईल, असे त्यांनी स्पष्ट सांगितले

शरद पवार काय म्हणाले?

बिहारच्या निवडणुकीचं विश्लेषण कसं कराल? असा प्रश्न पत्रकारांनी शरद पवारांना विचारला. त्यावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, “बिहारच्या निवडणुकीचं मतदान झालं. त्यानंतर मी काही लोकांशी बोललो. त्यांच्याकडून मला अशी माहिती मिळाली की बिहारच्या निवडणुकीत मतदान महिलांनी हातामध्ये घेतलं होतं. एक अशी शंका होती, ज्या अर्थी महिलांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदानात सहभाग घेतला, याचा अर्थ महिलांना त्यांच्या खात्यात १० हजार रुपये देण्याच्या योजनेचा हा परिणाम असावा”, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.