चंद्रपूर : गणपती विसर्जनाच्या दिवशी उभारण्यात येणाऱ्या स्वागत मांडवावरून भाजप नेते तथा माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार गट आणि आमदार किशोर जोरगेवार गटातील संघर्ष टिपेला पोहोचला आहे. गणपती विसर्जनाच्या दिवशी या संघर्षाचा स्फोट होऊन ‘मांडव’वरून ‘तांडव’ची भीती असल्याने महापालिकेने यावर ‘डिस्टेन्सिंग’चा उपाय शोधला आहे.
महापालिकेने या दोन्ही गटांच्या पदाधिकाऱ्यांना पत्र देऊन दोन मांडवात किमान १०० मीटर अंतर ठेवावे, असे निर्देश दिले. मुनगंटीवार समर्थक तथा भाजपचे माजी महानगर अध्यक्ष राहुल पावडे यांना लोकमान्य टिळक शाळेच्या उजव्या, तर जोरगेवार समर्थक तथा भाजपचे विद्यमान महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांना डाव्या बाजूला स्वागत मांडवासाठी नाहरकत प्रमाणपत्र महापालिकेकडून देण्यात आले.
नेमका वाद काय?
६ सप्टेंबर अनंत चतुर्दशीच्या दिवशी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन होणार आहे. विसर्जन मिरवणूक मुख्य मार्गाने काढण्याची मागील अनेक वर्षांची परंपरा आहे. मिरवणुकीच्या स्वागतासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून ठिकठिकाणी मांडव उभारले जातात. याच मांडवावरून भाजपचे नेते मुनगंटीवार व जोरगेवार गटात संघर्ष उफाळून आला आहे. पावडे यांनी लोकमान्य टिळक विद्यालयासमोर मांडव उभारण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्राची मागणी महापालिकेकडे केली होती. त्यानंतर लगेच चार दिवसांनी कसनगोट्टूवार यांनी त्याचस्थळी मांडव उभारण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र द्यावे, असा अर्ज महापालिकेकडे केला.
‘त्या’ जागेसाठी दोन्ही गट आग्रही
मुख्य रस्त्यावरील लोकमान्य टिळक शाळेजवळ दरवर्षी मुनगंटीवार यांच्याकडून मांडव टाकला जातो. याच मांडवात भाजपचे सर्व पदाधिकारी बसतात. त्यामुळे पावडे यांनी हीच जागा हवी, असा युक्तिवाद महापालिका आयुक्तांकडे केला. तर, कासनगोट्टूवार यांनीही, भाजपचा मांडव दरवर्षी तिथे असतो, असा आग्रह धरला. हा वाद महापालिकेतून थेट रस्त्यावर पोहोचला. मांडवाच्या ठिकाणी मुनगंटीवार व जोरगेवार गटांचे कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकल्यानंतर वातावरण तणावपूर्ण झाले. परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांनाही घटनास्थळ गाठावे लागले.
‘दोन मांडवांत १०० मीटर अंतर ठेवा’
महापालिका आयुक्त विपीन पालिवाल यांनी शाळेच्या उजव्या बाजूला पावडे, तर डाव्या बाजूला कासनगोट्टूवार यांना मांडवासाठी नाहरकत प्रमाणपत्र दिले. दोन्ही गटांनी तीन दिवसांपूर्वीच जागा ताब्यात घेऊन तिथे मांडवांच्या कामाला सुरुवात केली आहे. या दोन्ही मांडवांत दहा मिटरचे अंतर होते. मात्र, आता उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी दोन्ही मांडवात १०० मीटरचे अंतर ठेवण्याचे निर्देश दिले आहे. त्यानुसार महापालिका झोन क्रमांक २ चे सहायक आयुक्तांनी पावडे व कासनगोट्टूवार यांना पत्र पाठवून दोन्ही मांडवांत किमान १०० मीटर अंतर ठेवा, असे कळवले आहे.