गोंदिया: संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात नवरात्र उत्सव  शांततापूर्ण साजरा होत असताना  गोंदिया जिल्हा शिवसेना (उबाठा) प्रमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे शहर अध्यक्ष यांच्यात सार्वजनिक दुर्गा मंदिर मंडपात प्रवेश करण्यावरून राडा झाला. सोमवारी २९ सप्टेंबर रोजी रात्री ११:३० वाजता च्या सुमारास गोंदिया शहरातील मामा चौक सार्वजनिक दुर्गा उत्सव समिती मंडपात घडली.

याप्रकरणी मामा चौक सार्वजनिक दुर्गा उत्सव समितीचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहर अध्यक्ष नानू मुदलियार यांनी गोंदिया शहर पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार गोंदिया जिल्हा शिवसेना (उबाठा) प्रमुख माजी नगरसेवक पंकज यादव आणि त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका ललिता यादव आणि इतर सहा- सात लोक यांच्या विरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती गोंदिया शहर पोलीस निरीक्षक किशोर पर्वते यांनी दिली आहे.

 सोमवार २९ सप्टेंबर रोजी गोंदिया जिल्हा शिवसेना (उबाठा) प्रमुख, माजी नगरसेवक पंकज यादव हे  पत्नी  व माजी नगरसेविका ललिता यादव यांच्यासह   सार्वजनिक  मंडळात दुर्गा मातेचे दर्शन घेण्यासाठी गेले होते.  मंडपात प्रवेश करीत असताना त्यांना हवनकुंड निर्माण करण्याचे कार्य सुरू असल्याचे कारण सांगून त्यांना मूर्तीपर्यंत जाण्यास अडवण्यात आले.  त्यांनी अडवणाऱ्याच्या श्रीमुखात हाणली. हे पाहून मामा चौक दुर्गा उत्सव समितीचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे शहर अध्यक्ष नानू मुदलियार यांनी या वादात मध्यस्थी करत त्यांना मंडपात हवन कुंड निर्माण कार्य सुरू असल्यामुळे कुणालाही मंडपाच्या आज प्रवेश करण्यापासून तूर्त काही वेळेपर्यंत मनाई करण्यात आली असल्याचे सांगितले. 

शिवसेना जिल्हाप्रमुख पंकज यादव यांनी त्यांनाही मारहाण केली आणि त्यांच्या समर्थकांनी खुर्ची उचलून त्यांच्या अंगावर मारली, प्रसंगी हवन कुंड निर्माण कार्य करिता जागी असलेली वीट उचलून पण त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. दरम्यान मामा चौक सार्वजनिक दुर्गा उत्सव समितीच्या इतर सदस्यांनी वेळीच धाव घेत दोघांना  वेगळे केले असता प्रकरण शांत झाले. पण या सर्व घडलेल्या मारहाण आणि राड्याचे चित्रीकरण मंडपातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात टिपले गेले.  राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्षांनी पोलिसात  पंकज यादव आणि त्यांच्या पत्नी  ललिता यादव यांच्या विरोधात तक्रार दिली असल्यामुळे यादव दांपत्य आणि त्यांचे पाच-सहा समर्थक यांच्याविरुद्ध गोंदिया शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

 संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात आणि शहरात नवरात्र दुर्गा उत्सव भक्तीपूर्ण आणि उल्हासात साजरा होत असताना ऐन सार्वजनिक दुर्गा माता मंडपात झालेल्या या राड्यामुळे आणि याची माहिती संपूर्ण गोंदिया शहरात आणि जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरल्यामुळे या घटनेची सर्वत्र चर्चा आहे.