नागपूर : श्रीराम नवमी उत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेदरम्यान पोस्टर आणि झेंडा फाडल्याची अफवा उडाल्यामुळे दोन गट आमने-सामने उभे ठाकले. दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी झाली. त्यामुळे कोराडी पोलिसांनी दोन्ही गटांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला असता दोन्ही गटातील नागरिकांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांनीही लाठीमार केला. ही घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

या प्रकरणी कोराडी पोलिसांनी दोन्ही गटातील २०० वर लोकांवर गुन्हे दाखल करून २५ जणांना अटक केली. महादुला कोराडी येथील श्रीराम नवमी उत्सव समितीचे पदाधिकारी आशीष खुबेले यांनी कोराडी पोलिसांकडे रामनवमीची शोभायात्रा काढण्याची परवानगी घेतली होती. त्यानुसार बुधवारी सायंकाळी शोभायात्रा व मिरवणुकीला महादुल्यातून प्रारंभ झाला. या शोभायात्रेत शेकडो रामभक्तांचा समावेश होता.

हेही वाचा…यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शस्त्रक्रिया गृहास आग, रूग्ण नसल्याने जीवितहानी टळली

मध्यरात्रीच्या सुमारास शोभायात्रा महादुला मेन गेट सर्व्हिस रोडने जात असताना रस्त्याच्या कडेला डॉ. बाबासाहेब आंबेकडर जयंतीनिमित्त लावण्यात आलेले फलक, पताका आणि झेंडे त्यापैकी कुणीतरी फाडल्याची अफवा पसरली. तसेच भगवे झेंडे हातात असऱ्या युवकांनी निळ्या झेंड्याला फाडण्याचा प्रयत्न केल्याची अफवासुद्धा कुणीतरी पसरवली. त्यामुळे काही महिला-पुरुष रस्त्यावर येऊन गोंधळ घालत होते. त्यामुळे रामनवमीच्या शोभायात्रेतील लोकांनीसुद्धा गोंधळ घालण्यास सुरुवात केली. दोन्ही गटांनी एकमेकांना तुफान हाणामारी केली.

पोलिसांवर दगडफेक केल्याने लाठीचार्ज

निळा झेंडा फाडल्याची अफवा पसल्यानंतर एक गट रस्त्यावर उतरला. तर शोभायात्रेतील नागरिकांनीही त्यांचा प्रतिकार केला. त्यामुळे उडालेल्या गोंधळात पोलिसांनी सामंजस्याची भूमिका घेतली. त्यांनी दोन्ही गटातील युवकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन्ही गट आक्रमक होऊन त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांनी काही वेळ सावध पवित्रा घेतला. मात्र, शेवटी कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यामुळे पूर्णत: गोंधळाची स्थिती निर्माण झाली. शोभायात्रेतील नागरिक आणि अन्य गटातील नागरिकांची पळापळ झाली. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले.

हेही वाचा…“विजय वडेट्टीवार यांना मंत्रिपदाच्या काळातही भाजपात येण्याची घाई झाली होती…” धर्मरावबाबा आत्राम यांचा गौप्यस्फोट; म्हणाले, “त्या बैठकीत मी…”

यांच्यावर झाले गुन्हे दाखल …

मिरवणुकीतील अटी व शर्थीचे उल्लंघन केल्याप्रकरणी श्रीराम नवमी उत्सव समितीचे पदाधिकारी आणि शोभायात्रेचे आयोजक खुबेले (श्रीवासनगर, महादुला), राजकुमार महेश रहांगडाले, अक्षय रामाजी अवचार, प्रणय इंद्रजित विरखेडे, सौरभ विलास राऊत, निशिल राजू सोने, अमन बाट, शुभम झोडापे, विक्रांत झोडापे, विक्रांत वाणी, संजय नंदागवळी, संजय खंडारे, आकाश हुमणे, तुषार शंभरकर, कमलेश सहारे यांच्यासह २०० जणांवर गुन्हे दाखल केले. २५ जणांना अटक करण्यात आली अन्य आरोपींचा शोध सुरु आहे.