नागपूर : वडिलासोबत कामावर सहकारी मजूर असलेल्या व्यक्तीचे घरी येणे-जाणे होते. दरम्यान, त्याच्याशी मुलीची ओळख झाली. काही दिवसांतच अकरावीत शिकणाऱ्या मुलीला तो आवडायला लागला. दोघांनीही प्रेमविवाह करण्यासाठी घरातून पळ काढला. मध्यप्रदेशात पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या दोघांनाही गुन्हे शाखेच्या पथकाने गोंदियातून ताब्यात घेतले. मुलीला आईवडिलांच्या ताब्यात देण्यात आले असून आरोपी व्यक्तीला प्रतापनगर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

आरोपी सोन्या हा मूळचा रामटेकचा रहिवासी आहे. कामधंद्याच्या शोधात तो नागपुरात आला. तर अपहृत कविता (काल्पनिक नाव) हिचे कुटुंब मूळचे मध्यप्रदेशातील असून, तेसुद्धा कामाच्या शोधात नागपुरात आले. कविताला आई-वडील आणि एक भाऊ आहे. सोन्या हा एका बांधकाम ठेकेदाराकडे कामाला लागला. तेथेच कविताचे वडिलही काम करीत होते. सोबत कामाला असल्यामुळे दोघांची मैत्री झाली. सोन्याला जेवन करायला घरी आला. त्यावेळी त्याची ओळख मित्राची मुलगी कविताशी झाली. त्यानंतर तो अनेकदा घरी आला. यादरम्यान, कविता आणि सोन्याची मैत्री झाली. दोघांत प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यावेळी ती दहावीत होती. कविता अभ्यासात हुशार असल्याने तिला दहावीत ८५ टक्के गुण मिळाले. सध्या ती ११ वी विज्ञान शाखेत शिकते. नुकतीच ११ वीची परीक्षा आटोपली. अल्पवयीन असल्याचा फायदा घेत त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. लग्न करण्याचे आमिष दाखविले. तिनेही पलायन करून प्रेमविवाह करण्याची तयारी केली. ७ मे रोजी मुलीचे वडील कामावर गेले, तर आई बाहेरगावी. ही संधी साधून सोन्यासह कविताने पलायने केले. त्यांना मध्यप्रदेशात जाऊन लग्न करायचे होते. तत्पूर्वी दोघेही गोंदियात राहणाऱ्या सोन्याच्या बहिणीच्या घरी गेले. दरम्यान राणीची आई घरी परतली. तिला मुलगी दिसली नाही. तिने सर्वत्र शोध घेतला. विचारपूस केली.

हेही वाचा >>>Video: बिबट्याने झाडावर झेप घेतली अन्… पेंच व्याघ्र प्रकल्पात आक्रितच घडले

मात्र, कविताचा काही ठावठिकाणा लागला नाही. अखेर आईने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने समांतर तपास केला. सोन्याची संपूर्ण माहिती घेतली असता बहिणीच्या गावी गेल्याचे समजले. पथकाने गोंदिया पोलिसांशी संपर्क साधला. त्यांना दोघांचीही छायाचित्रे पाठविली. दोघेही बसस्थानकावर आढळून आले. दोघेही मध्यप्रदशात जाऊन लग्न करण्याच्या तयारीत होते. मात्र, वेळीच पोलिसांनी दोघांनाही पकडले. दोघांनाही नागपुरात आणल्यानंतर सोन्याला पोलिसांच्या ताब्यात, तर कविताला तिच्या कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आले. ही कारवाई पोलीस निरीक्षक ललिता तोडासे, राजेंद्र अटकाळे, सुनील वाकडे, शरीफ शेख, ऋषिकेश डुमरे, पल्लवी वंजारी, अश्विनी खोडपेवार यांनी केली.