नागपूर : वाघ आणि बिबट आसपास असतील तर सर्वात आधी माकडांना चाहूल लागते आणि मग ते आपल्या सहकाऱ्यांना ‘अलर्ट’ करतात. मात्र, मध्यप्रदेशातील पेंच व्याघ्रप्रकल्पात आक्रितच घडले. अवघ्या ६० मीटरवरुन बिबट झाडावर बसलेल्या माकडांना हेरत होता, पण त्या माकडांना त्याची भणकही लागली नाही. अवघ्या काही सेकंदात बिबट्याने रस्ता ओलांडून झाडावर झेप घेतली आणि क्षणार्धात त्या माकडाचा जीव घेतला. चिन्मय सालये या पर्यटकाने हा क्षण कॅमेऱ्यात कैद केला.
मंदार सालये आणि त्यांचे कुटुंबीय रविवारी मध्यप्रदेशातील तुरीया प्रवेशद्वारावरुन सफारीसाठी निघाले. अलीकट्टा पॉईंटकडून ते निघाले, पण त्यांना व्याघ्रदर्शन मात्र झाले नाही. थोड्या निराशेतच ते परतीच्या रस्त्याला लागले. त्यावेळी दुसऱ्या एका पर्यटक वाहनाने त्यांना नाल्यात बिबट असल्याचे सांगितले. ते समोर गेले आणि नाल्यातून तो बिबट हळूहळू बाहेर येतांना त्यांना दिसला. बाहेर येऊन तो लगेच गवतात लपला. त्यावेळी समोरच्या रस्त्याच्या पलीकडे झाडावर दोन माकडे होती. त्या झाडाला फांद्या होत्या, पण पाने नव्हती. या दोन माकडांना त्या बिबट्याने ६० मीटरपासूनच हेरले होते. त्याचवेळी दुसरीकडेही मोठ्या संख्येने माकडे होती, पण त्या माकडांकडे बिबट्याने दुर्लक्ष केले. त्या माकडांनाही त्याठिकाणी बिबट असल्याचा सुगावा लागला नाही. त्यामुळे एकमेकांना त्यांनी ‘अलर्ट कॉल’ दिला नाही. तो बिबट अगदी शिताफीने आपले सावज हेरत होता. त्याने माकडांच्या कळपावर नाही तर झाडावरच्या त्या दोन माकडांवर लक्ष केंद्रीत केले. बिबट गवतात दबा धरुन बसला होता आणि क्षणार्धात विजेच्या वेगाने त्याने झाडावर झेप घेत त्या माकडाची शिकार केली.
हेही वाचा >>>बुलढाण्यात परिचारिकेवर अत्याचार; बदनामीची धमकी देत…
पर्यटकांच्या डोळ्यासमोर हा सर्व प्रकार घडला, पण त्यांनाही क्षणभर काहीच लक्षात आले नाही. मंदार सालये यांनी हा अनुभव ‘लोकसत्ता’सोबत शेअर केला. अवघ्या २० फुटाचे ते झाड होते आणि त्या झाडाला पानही नव्हते. त्यावर ही दोन माकडे बसली होती. तीन ते चार वर्षाचा तो बिबट होता, पण सावज हेरणे काय असते, हे त्या बिबट्याकडे पाहिल्यानंतर कळाले. दिवसभर काहीच दिसले नाही म्हणून हताश झालेलो आम्ही ‘त्या’ बिबट्याच्या चतुराईने अवाक् झालो. व्याघ्रप्रकल्पात पर्यटनासाठी गेल्यानंतर पर्यटकांना वाघच दिसायला हवा असतो, पण बिबटही वाघाइतका किंबहुना त्याहीपेक्षा जास्त महत्वाचा आह. बिबट्याच्या शिकारीचे हे कौशल्य आम्हाला याची देही याची डोळा पाहता आले.