नागपूर : कवी कुलगुरू कालीदास संस्कृत विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय केंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सकाळी नागपूरमध्ये पार पडले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सरसंघचालक डॉ. मोहन भागवत उपस्थित होते. डॉ. भागवत आणि मुख्यमंत्री एकाच व्यासपीठावर असल्याने व कार्यक्रम संस्कृत विद्यापीठाचा असल्याने या कार्यक्रमाला महत्व होते.
या कार्यक्रमात सरसंघचालक काय बोलणार याबाबत जशी उत्सूकता होती तेवढीच मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांच्या भाषणाबाबतही उत्सूकता होती. या कार्यक्रमात फडणवीस यांचे भाषण उत्तम झाले. संस्कृत भाषेचे महत्व किती आहे हे अभ्यासपूर्ण सांगितले. पण ते सांगताना एक खंतही व्यक्त केली आणि जाहीरपणे व्यक्त केली. ती खंत नव्हतीच ती प्रांजळ कबुलीच होती. ती ज्ञानग्रहणाच्या संदर्भातील.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी त्यांच्या भाषणात कवी कुलगुरू कालीदास विद्यापीठ रामटेकला असताना त्याचे आंतरराष्ट्रीय केंद्र नापुरात का? हे स्पष्ट केले. नागपुरात केंद्र आणण्यासाठी रामटेकच्या लोकप्रतिनिधींचा असलेला विरोध आणि त्यावर काढलेला मार्गही विशद केला. रामटेकमधील विद्यापीठाचे केंद्र नागपूर मध्ये आणताना ते रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या हद्दीत राहवे म्हणून वारंगा या गावाची निवड केली असे ते म्हणाले.
महाराष्ट्रात सध्या भाषावाद जोरात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संस्कृत भाषेविषयी भरभरून बोलले. ते म्हणाले, संस्कृत ही ज्ञानभाषा आहे. समृद्ध भाषा आहे. ती ज्ञानाची गुरुकिल्ली आहे. तिचा प्रचार प्रसार होणे आवश्क आहे. भारताची प्राचीन संस्कृती आणि इतिहास संस्कृत भाषेमुळे पिढ्या अन पिढ्या जीवंत आहे. तो संस्कृत भाषेमुळेच. त्यामुळे ती अधिक समृद्ध असणे व होणे आवश्यक आहे. त्यासाठी सरकारम्हणून जे काही करणे शक्य आहे ते सर्व करण्याचा प्रयत्न आम्ही करू, असे फडणवीस म्हणाले.
फडणवीस काय म्हणाले
संस्कृत भाषेविषयी बोलताना या भाषेचा गुणगौरव करताना शेवटी फडणवीस यांनी एक खंतही व्यक्त केली. फडणवीस म्हणाले, “ एक मनातील गोष्ट सांगूनच टाकतो. मी संस्कृत शिकू शकलो नाही याची मला कायम खंत वाटत राहते. माजी आई एम.ए. संस्कृत आहे. ती असखलीतपणे संस्कृत बोलते. पण मी संस्कृत शिकू शकलो नाही. एका मोठ्या ज्ञानापासून वंचित राहिलो. पुढे ही भाषा शिकण्याचा प्रयत्न निश्चित करेल. पण जे ही भाषा शिकू इच्छितात त्यांच्यासाठी काम करणाऱ्या विद्यापीठाला तेथील विकासासाठी योगदान देऊन त्याचा भार उचलण्याचा मी प्रयत्न करणार आहे.”