लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले ऐतिहासिकदृष्ट्या महत्वपूर्ण कस्तुरचंद पार्क आता सामान्य नागरिकांसाठी उघडे असणार आहे. कस्तुरचंद पार्क नागरिकांसाठी खुले करण्याबाबत अलिकडेच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयात जनहित याचिका दाखल होताच जिल्हाधिकाऱ्यांनी पहाटे ५ ते सकाळी ११ पर्यंत तसेच सायंकाळी ५ ते रात्री ८ वाजतापर्यंत असे नऊ तासांसाठी कस्तुरचंद पार्क सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

निशांक नायक यांनी ॲड. राजेश नायक यांच्यामार्फत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेनुसार, कस्तुरचंद पार्क मैदानाच्या प्रवेशद्वाराला कुलूप ठोकण्यात आले आहे. त्याठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात असून हे सुरक्षा रक्षक सामान्य व्यक्तीला मैदानामध्ये प्रवेश करण्यात, खेळण्यास मनाई करीत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या ऐतिहासिक मैदानाचे योग्य संरक्षण व्हावे म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्वत:हून दाखल केलेली जनहित याचिका प्रलंबित आहे. त्यानुसार, या मैदानासह वास्तूचे संरक्षण करावे, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांसह स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहे. ही जनहित याचिका २ मे रोजी दाखल होताच जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ सरकारी वकिलांना पत्र पाठविले.

आणखी वाचा-सर्व कागदपत्रे असतानाही जातवैधता प्रमाणपत्र नाकारले ! उच्च न्यायालयाने जात पडताळणी समितीच्या सदस्यांना ठोठावला दंड

या पत्रानुसार, मैदानाच्या सुरक्षेसाठी सावनेर तालुक्यातील सिंघम सिक्युरीटी सर्व्हिसेसतर्फे दहा सुरक्षा रक्षक कस्तुरचंद पार्क मैदान परिसरामध्ये ५ जानेवारी २०२१ पासून तैनात करण्यात आले आहे. त्याबाबत १ जानेवारी २०२१ रोजी उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या शपथपत्रामध्ये माहिती नमूद करण्यात आली आहे. परंतु, १५ जून २०२१ पासून या सुरक्षा रक्षकांच्या संख्येमध्ये कपात करण्यात आली असून आता केवळ चार सुरक्षा रक्षक मैदानाच्या सुरक्षेसाठी तैनात आहेत. तसेच, मैदान सकाळी सहा तास आणि सायंकाळी तीन तासांसाठी नागरिकांसाठी खुले करण्यात येत आहे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले. जिल्हाधिकारी यांच्या या पत्रावर समाधानी नसून हे मैदान चोवीस तास नागरिकांसाठी खुले करण्यात यावे, असे आदेश देण्याची विनंती नायक यांनी या जनहित याचिकेतून केली आहे. याचिकाकर्त्यातर्फे ॲड. राजेश नायक बाजू मांडतील.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Collector opened kasturchand park after petition was filed in the court tpd 96 mrj