नागपूर : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी सुसंवाद वाढवण्यासाठी भेटीगाठींची मालिका सुरू केली आहे. या दौऱ्याची सुरुवात त्यांनी नागपूरमधील ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या घरी सदिच्छा भेट देऊन केली. आज सकाळी झालेल्या या भेटीत दोघांमध्ये पक्षाच्या सध्याच्या घडामोडींवर चर्चा झाली. यानंतर सपकाळ यांनी राऊत यांच्या घरून माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांना दूरध्वनीवरून संवाद साधला.

काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांचीही सपकाळ यांनी काही दिवसांपूर्वी भेट घेतली होती. तसेच माजी मंत्री सुनील केदार यांच्या घरी जाऊन त्यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या. केदार यांच्या मातोश्रींचे अलिकडेच निधन झाले होते. या भेटींच्या माध्यमातून सपकाळ यांनी पक्षातील ज्येष्ठ कार्यकर्ते आणि नेत्यांशी आपुलकीचे संबंध दृढ करण्याचा प्रयत्न केला आहे.

नवीन जबाबदारीनंतर सपकाळ राज्यभरातील संघटनात्मक बांधणीसाठी सक्रिय झाले आहेत. नागपूर दौऱ्यानंतर ते गडचिरोली येथे काँग्रेसच्या मेळाव्याला उपस्थित राहिले. या मेळाव्यात विविध पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

हर्षवर्धन सपकाळ यांच्या या भेटीगाठींमुळे पक्षात नवचैतन्य निर्माण झाल्याचे कार्यकर्त्यांमध्ये बोलले जात आहे. पक्षातील मतभेद दूर करून संघटन मजबूत करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना वरिष्ठ नेत्यांचा प्रतिसादही सकारात्मक असल्याचे संकेत मिळत आहेत.

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये मोठी हालचाल पाहायला मिळत आहे. नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर पक्षाची सूत्रे हर्षवर्धन सपकाळ यांच्या हाती आली आहेत. पराभवानंतर राज्यव्यापी दौरे आणि दिल्लीच्या भेटी करणारे नाना पटोले सध्या आपल्या मतदारसंघातच मर्यादित असून संघटनात्मक पातळीवर त्यांची सक्रियता कमी झाल्याचे दिसते.

दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी ओबीसींच्या प्रश्नांवर सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. अलिकडेच त्यांनी काढलेल्या ओबीसी मोर्चातून राज्य सरकारला थेट आव्हान देण्याचा प्रयत्न केला. या मोर्चामुळे वडेट्टीवार यांची ओबीसी नेते म्हणूनची प्रतिमा अधिक ठळकपणे समोर आली आहे. विशेष म्हणजे, या मोर्चात नाना पटोले आणि हर्षवर्धन सपकाळ उपस्थित नव्हते, तर पूर्व विदर्भातील अनेक काँग्रेस नेते वडेट्टीवार यांच्या पाठीशी उभे राहिले.

या घडामोडींमुळे काँग्रेसमध्ये नव्या नेतृत्वाच्या चर्चांना उधाण आले आहे. नाना पटोले यांच्या निवृत्तीच्या पार्श्वभूमीवर वडेट्टीवार यांचे वाढते महत्त्व आणि सपकाळ यांची संघटन कौशल्ये यामुळे पक्षाच्या भविष्यातील नेतृत्व समीकरणांवर सगळ्यांचे लक्ष केंद्रित झाले आहे.