यवतमाळ : विदर्भातील सोयाबीन शेतकऱ्यावर एका मागून एक संकट येत आहे. सोयाबीनच्या पिकाला हमीभाव मिळत नाही, अशात आता ‘येलो मोझॅक’ या रोगामुळे शेतकऱ्यांच्या हातात आलेलं पीक देखील उद्धवस्त झाले आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पंजाबच्या धर्तीवर सरकारने मदत करावी, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी केली.
कळंब तालुक्यातील बेलोना गावातील शेतात शुक्रवारी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी पाहणी केली. यावेळी सोयाबीन पिकावर ‘येलो मोझॅक’ या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याचे आढळून आले. या रोगामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून सुमारे ८० टक्के शेंगांमध्ये दाणे तयारच झालेले नाहीत, तर उरलेला दाणा अत्यंत बारीक असल्यामुळे शेतकऱ्यांना काढणीचा खर्चही परवडणारा नाही, अस वडेट्टीवार म्हणाले. या संकटामुळे शेतकऱ्यांच्या हातात उत्पादनच येणार नाही. एकीकडे अतिवृष्टी, दुसरीकडे रोगाचा प्रादुर्भाव सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहे. पंजाबच्या धर्तीवर शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार रुपये तात्काळ मदत देणे आवश्यक आहे, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. जिल्ह्यात यावर्षी अतिवृष्टी झाली आहे. सततत्या पावसामुळे पिकं आता पिवळी पडली असून माना टाकत आहेत. मराठवाड्यात अतिवृष्टीनंतर मदतीची घोषणा शासनाने केली. मात्र विदर्भात सर्वत्र अतिवृष्टी होवूनही येथील शेतकऱ्यांसाठी शासनाने अद्यापही मदतीची घोषणा न केल्याने शेतकरी हवालदिल झाला असल्याचे यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी सांगितले. शेती खरडून केल्याने जगण्याचे प्रश्न गंभीर झाल्याचे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले.
‘येलो मोझॅक’ या रोगाचा प्रादुर्भाव यवतमाळ, वाशिम, वर्धा, चंद्रपूर अशा अनेक जिल्ह्यात झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना एक क्विंटल देखील उत्पन्न मिळणार नाही, शेतकऱ्यांचे संपूर्ण हंगामाचे नुकसान होणार आहे. याबाबत पाहणी करून शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी कृषिमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे. या पाहणी दौऱ्यात माजी आमदार वजाहत मिर्झा, अनिल गायकवाड, अरविंद वाढोणकर, कौस्तुभ शिर्के, आशिष महले, सरपंच सुखदेव चावरे आदी उपस्थित होते.
सरकारवर टीका
एकीकडे अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीने शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे आणि दुसरीकडे शासन त्यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. हे शासन नाकर्ते आहे. जनतेच्या दु:खापेक्षा राजकारणाला महत्त्व देतात, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली. शेतकऱ्यांची हतबल अवस्था पाहताना अनेकांच्या डोळ्यांत अश्रू येतात. शेतकऱ्यांचे दुःख, वेदना आणि त्यांची आर्थिक दुर्दशा अनुभवून आमदार वडेट्टीवार यांनी शासनाच्या नाकर्तेपणावर तीव्र संताप व्यक्त केला.