नागपूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे पुत्र संकेतच्या  ऑडी कारने दोन चारचाकी आणि एका दुचाकीला धडक दिली. या घटनेनंतर  विरोधी पक्षाच्या निशान्यावर भाजप आणि गृहमंत्री आहे.

शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी गुरुवारी थेट नागपूर गाठले आणि सीताबर्डी पोलिसांकडून या प्रकरणाची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी भाजप, गृहमंत्रालयावर अनेक प्रश्न उपस्थित केले. ऑडीमध्ये बसलेल्या संकेत बावनकुळे यांचे एफआयआरमध्ये नाव नसल्याबद्दल त्यांनी ठाणेदाराला थेट प्रश्न विचारला. हे प्रकरण हाताळण्यात पोलीस असक्षम ठरले की बावनकुळे भारी पडले ?, असेही ठाणेदाराला विचारणा केली. त्यावर ठाणेदार यांनी काहीही ठोस उत्तर दिले नाही. संकेत बावनकुळे यांचे रक्ताचे नुमने घेण्यात का आले नाही. नागपुरातील लोहारी बारमधून ऑडीने संकेत आणि त्याचे मित्र निघाले होते. वाटेत त्यांनी सर्वप्रथम रामदास पेठेत दोन चारचाकींना धडक दिली. लोकांनी संकेत आणि त्यांच्या मित्रांना चोप दिला. तेथून पळून जात असताना मानकापूर भागात पुन्हा एका दुचाकीला धडक दिली. तसेच त्यांनी बारमध्ये गायीचे मांसाचे (बीफ) ऑर्डर दिले होते. ही सर्व माहिती दडवण्यात येत आहे. या प्रकरणात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे बावनकुळे यांच्या पुत्राला वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला.

हेही वाचा >>> नागपूर : पोलीस अवैध धंदेवाल्यांच्या संपर्कात! पोलीस कर्मचारीच निघाला….

दरम्यान, ही घटना माझ्या मतदारसंघात घडली आहे. त्यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. या प्रकरणाची आम्हाला बाहेरून आलेल्या सुषमा अंधारे यांच्यापेक्षा अधिक माहिती आहे, असे वक्तव्य कॉंग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी केले होते. या वक्तव्याबाबत विचारणा केली असता सुषमा अंधारे यांनी ठाकरे यांचे वक्तव्य स्थानिक राजकारणाचा भाग असू शकतो, असे उत्तर दिले. तसेच त्यांना जर माहिती होती तर या प्रकरणावर बोलण्यास ३६ तास का लागले, असा सवालही त्यांनी केला.

हेही वाचा >>> नागपूर : “संकेत बावनकुळेची वैद्यकीय तपासणी नाही, गुन्हाही दाखल नाही; देवेंद्र फडणवीसांनी आता…” सुषमा अंधारेंचा हल्लाबोल

ठाकरेंचे प्रतिउत्तर

यासंदर्भात नंतर ठाकरे यांनी आम्ही चोवीस तास लोकांमध्ये राहून राजकारण करतो. केवळ प्रसिद्धी माध्यमातून राजकारण करीत नाही, असा टोला अंधारे यांना लगावला. तसेच या प्रकरणात माझी कोणतीही वेगळी भूमिका नाही. दोषींना शिक्षा झाली पाहिजे, असेही ठाकरे म्हणाले.

संजय राऊत यांचा हल्लाबोल

बावनकुळे कार अपघातप्रकरणात पुन्हा नवा वाद निर्माण झाला आहे.  संकेत यांनी गायीचे मांस ऑर्डर केल्याचा आरोप आहे . यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. हिंदुत्व शिकवणाऱ्या पक्षाच्या नेत्याचे पुत्र गोमांस  खातात, त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवायाचे काय, असा प्रश्न उपस्थित करून भाजपवर निशाना साधला.