गडचिरोली : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी काँग्रेसने महाविकास आघाडीतील मित्रपक्षांसह एकत्र लढण्याची रणनीती आखली आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा निर्धार काँग्रेसने केला असला तरी गडचिरोली नगरपालिकेच्या अध्यक्षपदासाठी इतर पक्षातून उमेदवार आयात करण्याची वेळ काँग्रेसवर आली आहे. नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला उमेदवारासाठी राखीव आहे.

भाजपचा विस्तार रोखण्यासाठी आगामी स्थानिक स्वराज संस्था निवडणुकांमध्ये काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) हे सर्व पक्ष एकत्र लढतील. मित्रपक्षांनी यास तत्त्वत: संमती दिली आहे. लवकरच जागा वाटपाचा ‘फॉर्म्युला’ निश्चित होणार असल्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी सांगितले. भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात सुरू असलेल्या कथित वादावर भाष्य करताना ते म्हणाले, त्यांचा वाद सत्तेसाठी आहे; जनता योग्य तो निर्णय देईल. काँग्रेसने जिल्ह्य़ातील पायाभूत सुविधा, आदिवासी व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लढा दिला असून, मित्रपक्षांची साथ मिळाली, तर भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे अशक्य नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दुसरीकडे, गडचिरोली नगराध्यक्षपदासाठी सर्वसाधारण गटातील महिला उमेदवाराची निवड करताना सर्वच पक्षांचा कस लागत आहे. यासाठी भाजपमध्ये काही प्रमाणात स्पर्धा दिसून येत आहे. मात्र, काँग्रेसकडे सक्षम चेहराच नसल्याने त्यांनी मित्र पक्षातीलच एका महिला नेत्याला पक्षात घेण्याचे ठरवले आहे. यासाठी २७ ऑक्टोबरला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार हे जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत सकाळी ११ वाजता काँग्रेसचा मेळावा होणार असून, या कार्यक्रमात विविध पक्षांचे मातब्बर नेते व पदाधिकारी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

मतदार यादीवर आक्षेप

प्रारूप मतदार यादीत अनेक अनियमितता आढळल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. काही मृत मतदारांची नावे यादीत कायम असल्याचे, तर काहींचे प्रभाग अचानक बदलल्याचे निदर्शनास आले आहे. प्रशासनाने हा घोळ तातडीने दूर करून योग्य ती दुरुस्ती करावी, अशी मागणी जिल्हाध्यक्ष ब्राह्मणवाडे यांनी केली आहे.