अकोला : मुली, तरुणी व महिलांसंदर्भातील गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. अपहृत प्रकरणांमध्ये अनेक वर्ष शोध लागत नाही.जिल्ह्यात मात्र तब्बल १२१ गुन्ह्यांमध्ये अपहृत पीडितांचा शोध घेण्यात आला आहे. अनैतिक मानवी वाहतूक कक्षाने गुन्ह्यातील पीडितांचा कसून शोध घेतला. त्यातून जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात दाखल १२१ गुन्हे उलगडण्यात यश आले.

तेल्हारा येथील एका पीडित मुलीचा तब्बल नऊ महिन्यानंतर शोध लागला आहे.गेल्या काही वर्षांमध्ये महिलांविषयक गुन्ह्यांचा आलेख वाढल्याचे दिसून येते. या प्रकरणांचा सखोल व तत्काळ तपास होणे गरजेचे असते. या पार्श्वभूमीवर अनैतिक मानवी वाहतूक कक्ष महिला व बाल अत्याचारासंदर्भाने कलम ३६३ भांदवि /१३७(२) भा. न्या. सं.चा तपास करण्यासाठी सुरू करण्यात आले.

अनैतिक मानवी वाहतूक कक्षाने अनेक प्रकरणांमध्ये तपासाला गती दिली. त्यातून आतापर्यंत १२१ गुन्हे उघडकीस आले आहेत. तेल्हारा पोलीस ठाण्यामध्ये २४ डिसेंबर २०२४ रोजी दाखल तक्रारीनुसार पीडित मुलीला घेऊन संशयित आरोपी फरार झाला होता. गुन्ह्याच्या तपासात पीडित मुलगी व संशयित आरोपीचा पुणे, मुंबई, शेगांव, नाशिक, संभाजीनगर येथे शोध घेण्यात आला. मात्र, त्यांचा थांगपत्ता लागला नाही. गुन्ह्याच्या तपासादरम्यान गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली.

पीडित मुलगी संशयित आरोपीसह अकोला बसस्थानकावर येत असल्याचे कळताच पोलीस पथक त्याठिकाणी दाखल झाले. बसस्थानकावर शोध मोहीम राबवली असता त्या ठिकाणी एक मुलगा व मुलगी पोलिसांना आढळून आले. त्यांचे नाव व पत्ता विचारल्यावर ते तेल्हारा येथील गुन्ह्यातील पीडित मुलगी व संशयित आरोपी असल्याची पोलिसांची खात्री झाली. त्यांना अनैतिक मानवी वाहतूक कक्षात आणून चौकशी करण्यात आली. प्राथमिक चौकशी केल्यानंतर पुढील तपासासाठी त्यांना तेल्हारा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अपहृत पीडित मुलगी तब्बल नऊ महिन्यानंतर तेल्हारा येथे परतली. ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी, उपविभागिय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. कविता फुसे, स.पो.उप.नि. सुरज मंगरूळकर, पो.हे.कॉ. प्रदीप उंबरकर, विशाल मोरे, दिनेश सिरसाट, अनिता टेकाम, वैशाली रणवीर, पुनम बचे, भागवत काळे आदींच्या पथकाने केली. जिल्ह्यात अपहृत प्रकरणातील इतर गुन्ह्यांमध्ये सुद्धा तत्परतेने पीडित मुली व आरोपींचा शोध अनैतिक मानवी वाहतूक कक्षाकडून घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले.