नागपूर : लहान मुला-मुलींवरील लैंगिक अत्याचारांच्या घटनांमध्ये (पोक्सो) सातत्याने वाढ होत असून गेल्या पाच महिन्यांत मुंबईत पोक्सो संदर्भातील चक्क तिप्पट गुन्हे दाखल झाले. नागपूर आणि पुणे शहरात मात्र पोक्सो गुन्ह्यांवर नियंत्रण आहे. मुंबईत पाच महिन्यांत ३९० गुन्हे दाखल झाले आहेत तर पुणे (८७) आणि नागपूर (५२) गुन्हे दाखल आहेत, ही धक्कादायक माहिती महाराष्ट्र पोलिसांच्या संकेतस्थळावरून समोर आली आहे.

राज्यात तरुणी आणि महिलांवर लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. तसेच अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्येसुद्धा सातत्याने वाढ होत आहे. या प्रकाराची राज्य महिला आयोगाने गांभीर्याने दखल घेतली आहे. मात्र, राज्यातील बाललैंगिक अत्याचाराच्या (पोक्सो) घटनांची आकडेवारी चिंताजनक आहे. सध्यस्थितीत लहान मुले-मुलींही सुरक्षित राहिलेली नाही. गेल्या पाच महिन्यांत मुंबईत वयाच्या १८ वर्षांपेक्षा लहान मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या तब्बल ३९० घटनांची नोंद पोलिसांच्या दप्तरी झाली आहे. लहान मुलांच्या निष्पाप आणि अजाणतेपणाचा फायदा घेऊन करण्यात येणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये अन्य शहरांच्या तुलनेत मुंबईत तिप्पट वाढ झाली आहे. एप्रिल महिन्यात सर्वाधिक ९८ तर मार्च महिन्यांत ९५ पोक्सोच्या गुन्ह्यांची नोंद मुंबईत झाली आहे. पुण्यात पोक्सो संदर्भातील ८७ गुन्हे दाखल करण्यात आली आहेत. एप्रिल महिन्यात सर्वाधिक ३० तर मार्च महिन्यात २४ पोक्सोच्या घटनांची नोंद आहे. फेब्रुवारी महिन्यात सर्वात कमी म्हणजे ११ घटनांची नोंद करण्यात आली. तर नागपुरात बाललैंगिक अत्याचाराच्या ५२ घटना घडल्या आहेत. हे प्रमाण राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत खूप कमी आहे. बाल लैंगिक शोषणाच्या प्रकारांवर आळा घालण्यासाठी कठोर धोरणाची तसेच शिक्षेची तरतूद करण्यात आली असली तरी बाललैंगिक अत्याचाराची प्रकरणे थांबलेली नाही.

हेही वाचा – अमळनेर येथे होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी रवींद्र शोभणे

आरोपींमध्ये सर्वाधिक नातेवाईक

अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटनांमधील आरोपींमध्ये सर्वाधिक नातेवाईक, मित्र, प्रियकर, ओळखीचा व्यक्ती, प्रशिक्षक-शिक्षकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. मुलींना चॉकलेट, खाऊ किंवा पैशाचे आमिष दाखवून अश्लील चाळे किंवा थेट शारीरिक संबंध प्रस्थापित केले जातात. अनेकदा दमदाटी आणि जीवे मारण्याची धमकी किंवा अश्लील छायाचित्र प्रसारित करण्याची धमकी देऊन लैंगिक अत्याचार केला जातो. अनेक प्रकरणात आरोपी नातेवाईक असल्यामुळे पोलीस ठाण्यापर्यंत प्रकरणे पोहोचतच नाही.

हेही वाचा – निराधार विवाहितेला आधी दिला आश्रय, नंतर लाखो रुपयात केला तिच्या विक्रीचा सौदा; मात्र…

पोलिसांना गांभीर्य नाही

पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याची तक्रार देण्यास आलेल्या पालकांना पोलीस टाळाटाळ करतात. मुलीची बदनामी होण्याची भीती घालवून पालकांचे खच्चीकरण करतात. पोलिसांना अशा गुन्ह्याचे गांभीर्य नसल्यामुळे आरोपींची हिम्मत वाढते. बाललैंगिक अत्याचार, वाढते गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांनी शाळेत ‘गूड टच बॅड टच’, मुले-पालक-शिक्षक संवाद, बाल पोलीस मित्र, पोलीस काका, पोलीस दीदी या माध्यमातून मुलींच्या समस्या जाणून घ्याव्यात.