महेश बोकडे
नागपूर: उपराजधानीत उन्हाचा प्रकोप शमन्याचे नाव घेत नसून मागील दोन दिवसांत शहराच्या विविध भागात ७ अनोळखी स्त्री- पुरूषाचे मृतदेह आढळले. हे सर्व उष्माघाताचे बळी असावे, असा संशंय व्यक्त केला जातो. मात्र शवविच्छेदन अहवालातूनच त्यांच्या मृत्यूंचे अचूक कारण स्पष्ट होईल.
उपराजधानीतील छावनी चौक बस स्थानक परिसरात ७ जूनच्या ५.१५ वाजता एका ४५ वर्षीय अनोळखी महिला पडलेली आढळली. तिला मेयो रुग्णालयात हलवले असता तिचा आधीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. मोठा ताजबाग परिसरात ७ जूनला एका ४५ वर्षीय अनोळखी पुरूष, इमामवाडा पोलीस ठाणे हद्दीतील कामगार भवन परिसरात ७ जूनला एक ३० वर्षीय पुरूष, ८ जूनला मेडिकलच्या वार्ड क्रमांक ८२ जवळ एक ३७ वर्षीय अनोळखी पुरूष, बर्डीतील मुनलाईन फोटो स्टुडिओ जवळ एक ४० वर्षीय अनोळखी पुरूष, पाचपावलीतील ठक्करग्राम पुलाच्या पिल्लरजवळ ८ जूनला एक ३० वर्षीय पुरूष, यशोधरानगर एनआयटी मैदानाजवळ एक मृतदेह आढळला. या सर्वांना शासकीय रुग्णालयात हलवले असता त्यांचा तेथे येण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे पुढे आले. या मृतदेहांचे शवविच्छेदन केले जाणार आहे. त्यांतर मृत्यूंचे नेमके कारण स्पष्ट होईल.
पूर्व विदर्भात १६ संशयित मृत्यू
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पूर्व विदर्भात १ मार्च ते ९ जूनपर्यंत उष्माघाताच्या ६४१ रुग्णांची नोंद आहे. यापैकी २६८ चंद्रपूर, गडचिरोली ३५, गोंदिया ६२, नागपूर ग्रामीण ३९, वर्धा ४६, नागपूर महापालिका १६९, चंद्रपूर महापालिका १४ रुग्णांचा समावेश आहे. यापैकी भंडाऱ्यात १, नागपूर ग्रामीण २, नागपूर महापालिका हद्दीत १३ संशयित मृत्यू नोंदवले गेले. दरम्यान एकाचाही मृत्यू उष्माघाताने झाल्याची खात्री पटली नाही. असा दावा महापालिकेच्या आरोग्य विभागाने केला आहे.