नागपूर : सोलर डिफेन्स आणि एरोस्पेस लिमिटेड कंपनीला मिहान-सेझमध्ये सुमारे २२३ एकर जमीन आवंटीत करण्यास मंजुरी देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाची शुक्रवारी मुंबईत बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला.

मिहानमधील विशेष आर्थिक क्षेत्रात सोलर डिफेन्स ॲण्ड एरोस्पेस लिमिटेड या खासगी कंपनीला संरक्षण व एरोस्पेस क्षेत्रात गुंतवणुकीसाठी २२३ एकर जमीन मंजूर करण्यात आली आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून ही जमीन अधिकृतपणे देण्यात आली असून, या प्रकल्पामुळे विदर्भात औद्योगिक विकासाला नवे बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

एसडीएएल भारतातील सर्वात मोठी औद्योगिक स्फोटक उत्पादक आहे.

ही कंपनी नागपुरात एक डिफेन्स आणि एरोस्पेस प्रकल्प स्थापण्यासाठी १२,७८० कोटी गुंतवणूक करणार आहे. यामुळे सुमारे ६,८२५ थेट नोकऱ्या निर्माण होतील. त्याशिवाय, ६६० कोटींनी ट्रान्सपोर्ट विमान आणि डिफेन्स उपकरण उत्पादन युनिटमध्ये गुंतवणूक केली जाईल. यामुळे सुमारे ८७५ थेट आणि अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण होतील. हा उपक्रम नागपूर आणि विदर्भमध्ये डिफेन्स आणि एरोस्पेस गुंतवणूक आणि औद्योगिक वृद्धीला गती देईल.

या प्रकल्पात लष्करी उपकरणे, अचूक शस्त्र प्रणाली, ड्रोन्स, आणि हवाई संरक्षण संबंधित यंत्रणांचे उत्पादन व संशोधन होणार आहे. मिहान-सेझ ही देशातील महत्त्वाची औद्योगिक व आर्थिक झोन असून, याठिकाणी अशा प्रकारच्या प्रकल्पामुळे महाराष्ट्राला ‘डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग हब’ म्हणून ओळख मिळण्यास मदत होईल. केंद्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमांतर्गत हा प्रकल्प महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

राज्य सरकारनेही या प्रकल्पाला सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली असून, आवश्यक त्या सवलती आणि पायाभूत सुविधांची हमी देण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे या भागासाठी औद्योगिक प्रगतीच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरणार आहे.

ड्रोन, क्षेपणास्त्र प्रणाली, रडार्स

सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड ही भारतातील एक खासगी कंपनी असून ती संरक्षण व एरोस्पेस क्षेत्रात कार्यरत आहे. कंपनी लष्करी उपयोगासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उपकरणे, ड्रोन, क्षेपणास्त्र प्रणाली, रडार्स आणि अन्य हवाई संरक्षण यंत्रणांचे उत्पादन करते. ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ यासारख्या सरकारी उपक्रमांशी सुसंगत प्रकल्प राबवून देशी उत्पादनाला चालना देणे हा कंपनीचा उद्देश आहे. मिहान-सेझमध्ये उत्पादन प्रकल्प उभारून कंपनी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मागणीनुसार उत्पादन वाढवण्याच्या दिशेने काम करत आहे.