नागपूर: दिल्लीच्या लाल किल्ला परिसरातील मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर १ च्या बाहेर भीषण स्फोट झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. या घटनेत किमान ९ जणांचा मृत्यू झाला असून १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. या स्फोटानंतर परिसरातील काही वाहनांनी पेट घेतला होता. या स्फोटाच्या घटनेनंतर अग्निशमन दल आणि पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर आता या संपूर्ण घटनेचा तपास सुरू करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्ली येथे झालेल्या घटना नंतर केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. नागपूर मध्ये प्रसार माध्यमांशी ते बोलत होते.
नाना पटोले म्हणाले की, आम्हीच करू शकतो अश्या पद्धतीने आश्वासन देऊन लोकांना मूर्ख बनवले. आता कश्मीर असुरक्षित आहे, छप्पन इंचाची छाती आता कुठे गेली आहे. आम्हाला राजकारण करायचे नाही. दिल्लीत आणि केंद्रात यांचे सरकार असताना हे आतंकवादी या ठिकाणी आले कुठून असा प्रश्न निर्माण होत आहे. नरेंद्र मोदींनी दिलेल्या खोटे आश्वासनाची पोलखोल आता झाली आहे. हा भ्याड हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. पुलवामा, पहेलगाम हल्ला झाला तेव्हा सरकारच्या सोबत होतो. मात्र पहेलगाम, पुलवामाच्या घटनेनंतर राजकारण केलं नाही. मात्र सरकार त्यानंतर हे काही करू शकले नाही आतंकवादाला पकडू शकले नाही. हे केंद्र सरकारचे अपयश आहे. त्याची जबाबदारी केंद्र सरकारने स्वीकारावी. निवडणुका लढणे आणि पक्ष जिंकवणे अशा पद्धतीची भाजपची भूमिका असते. देश हित आणि सुरक्षेबद्दल त्यांच्याजवळ कुठलाही योजना नाही.
दहशतवादावर भाजपच राजकारण करत आहे
गृहमंत्री अमित शहा बिहारमध्ये विना कॅमेरा एका हॉटेलमध्ये थांबले आहेत. ते कशासाठी थांबले आहेत. कोणत्या लोकांना ते भेटत आहे. कुठलीही सुरक्षा न घेता विना कॅमेरा सीसीटीव्ही फुटेज बंद करून गृहमंत्री अमित शहा काय करत आहेत. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत, असे नाना पटोले म्हणाले.
दहशवादावर राजकारण करू नये असे प्रश्न उपस्थित केले जातात. मात्र मुंबईवर २६ /११ चा हल्ला झाला त्यावेळी भाजपने असेच प्रश्न उपस्थित केले होते. आता त्यांनी याचे उत्तर दिले पाहिजे. आम्हाला यात राजकारण करायचा नाही पण देशाच्या सुरक्षेचा हा प्रश्न आहे. मुंबईच्या आतंकवादी हल्ल्यात आम्ही तिथेच आतंकवाद्यांना कंठस्नान घातले. या बॉम्बस्फोटामध्ये आतंकवादी येतात सरकार बिहारच्या प्रचारात मग्न आहे. या प्रश्नाचे उत्तर द्यावं लागणार आहे. देश सुरक्षित नाही देशाच्या सुरक्षेचे हमी घेणारे प्रधानमंत्री, गृहमंत्री कुठे लपले आहे. हे लोक राजीनामे देणार नाही असेही नाना पटोले म्हणाले.
