लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत काम करीत होतो आणि तेच काम करण्याचा निश्चय केला होता. पण, अचानक मला संघाकडून भाजपचे काम करण्याचा आदेश मिळाला. मी त्यासाठी तयार नव्हतो. पण स्वयंसेवकाला आदेशाचे पालन करावे लागते, असे सांगण्यात आले व मी संघाच्या आदेशाचे पालन करीत भाजपमध्ये काम सुरू केले, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली.

दिवंगत विलास फडणवीस यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी सेवाभावी संस्थांना जिव्हाळा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यंदा धरमपेठ महिला को-ऑपरेटिव्ह सोसायटी येथे आयोजित या समारंभात फडणवीस यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. संस्थेच्या अध्यक्षा नीलिमा बावणे, अविनाश संघवई, नागेश पाटील, श्रीधरराव गाडगे आदी मान्यवर उपस्थित होते. नागपूरमधील संवेदना, स्कूल फॉर न्युरोडायव्हर्ट चिल्ड्रन आणि अकोल्याच्या गायत्री बालिकाश्रम या संस्थांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यानंतर ज्येष्ठ कीर्तनकार, व्याख्याते विवेक घळसासी यांनी फडणवीस यांची मुलाखत घेतली. अत्यंत कौटुंबिक स्वरूपाच्या या मुलाखतीत घळसासी यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांना फडणवीस यांनी मनमोकळी उत्तरे दिली.

आणखी वाचा-पर्यटकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे; समितीची स्थापना

राजकीय जीवनात दिवंगत विलास फडणवीस यांच्या प्रभावाची आठवण सांगताना फडणवीस यांनी त्यांच्या अभाविप ते भाजप प्रवासाचे वर्णन केले. मी अभाविपमध्ये काम करण्याचे ठरवले होते. तेच काम पुढे नेण्याचा माझा निश्चय होता. एक दिवस अचानक मला सुनील आंबेकर यांनी सांगितले की, तुला भाजपमध्ये काम करायचे आहे. काही शंका असेल तर विलास फडणवीस यांना भेटण्याची सूचना केली. हा निर्णय मला अजिबात आवडला नसल्याने मी विलास फडणवीस यांची भेट घेतली व त्यांना अभाविपमध्येच काम करण्याची इच्छा असल्याचे स्पष्टपणे सांगितले.

पण त्यांनी मला ‘तू स्वयंसेवक आहेस, स्वयंसेवकांचे काम आदेश पाळण्याचे असते’ याची आठवण करून दिली आणि मी त्याचा निर्णय स्वीकारून भाजपचे काम सुरू केले. विलास फडणवीस यांच्या कामाचा प्रभाव माझ्यावर आहे. खिशात एक रुपया नसतानाही शेकडो कोटी रुपयांची कामे सुरू करण्याची हिम्मत ही त्यांच्यामुळेच मिळाली. नागपूरचे कॅन्सर इस्पितळ उभारणीची प्रेरणाही त्यांच्याकडूनच मिळाली असे फडणवीस म्हणाले. या कार्यक्रमात फडणवीस यांनी त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. राजकारणात कधीही काहीही होऊ शकते, अशी गुगलीही त्यांनी टाकून उत्सुकता वाढवली

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis talk about his political career in bjp and about rss cwb 76 mrj