नागपूर : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वीच पोलीस दलातील अधिकाऱ्यांची बदली प्रक्रिया पार पाडण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले. त्यासाठी तीन वर्षे सेवा पूर्ण आणि स्वग्राम यासह अन्य अटी-नियम लावण्यात आले आहेत. परंतु, नागपुरातील अनेक पोलीस उपनिरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस निरीक्षक अजूनही शहरात ठाण मांडून आहेत. त्यामुळे पोलीस आयुक्तालयाकडून निवडणूक आयोगाच्या आदेशाची पायमल्ली होत असल्याचा आरोप होत आहे.

निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या अनुषंघाने राज्य पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस निरीक्षक दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे निर्देश दिले होते. त्यासाठी पोलीस महासंचालक कार्यालयानेही पत्रव्यवहार करीत बदलीच्या अटी व नियमांत बसणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची यादी पाठविण्याचे आदेश दिले होते. मात्र, अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी एकाच आयुक्तालयात तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतरही पळवाटा शोधून ‘साईट पोस्टींग’ला असल्याचे पुढे करून बदलीच्या यादीतून नावे कमी केली. तसेच नागपूर आयुक्तालयातील काही पोलीस अधिकारी स्वग्राम म्हणजेच नागपूरकर असल्यानंतरही बदलीच्या कचाट्यातून सुखरुप बाहेर पडले. काही पोलीस अधिकाऱ्यांनी नागपुरातच शिक्षण घेतले आणि स्वत: नागपूरचे रहिवासीसुद्धा आहेत, तरीही नागपुरातून बाहेर जिल्ह्यात बदली होऊ नये म्हणून आयुक्तालयातील लिपिक वर्गाला हाताशी धरुन ‘सेटिंग’ केल्याचा आरोप होत आहे. बाहेर जिल्ह्यातील अनेक अधिकारी बदलीस पात्र असूनही त्यांचे बदलीच्या यादीत नाव नसल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. निवडणूक आयोगाच्या पत्रामध्ये बदली संदर्भात स्पष्टपणे अटी नमुद असतानाही बदली पात्र अधिकांऱ्याची बदली न केल्याने आदेशाची पायमल्ली झाल्याचे बोलल्या जाते.

हेही वाचा – सेल्फीस नकार देत पालकाने मुख्यमंत्र्यांना केला थेट सवाल; काय आहे प्रकरण? जाणून घ्या

निवडणूक आयोगाच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करणे क्रमप्राप्त आहे. येत्या ३० जून २०२४ पर्यंत अनेकांचा ३ वर्षांचा कालावधी पूर्ण होत आहे. तसेच स्वग्राम कार्यरत असणाऱ्या अधिकांऱ्याचीसुद्धा बदली करावी, असे नमुद असतानाही काही अधिकाऱ्यांची बदली न होणे, हे मोठे आश्चर्य आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

हेही वाचा – निवृत्त न्यायाधीश २० हजारांत भरणपोषण कसे करणार? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र शासनाला सवाल

निवडणूक आयोगाच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्यात आले. पोलीस महासंचालक कार्यालयाकडून आलेल्या आदेशानुसार पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. बदलीस पात्र असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची यादी महासंचालक कार्यालयात पाठविण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बदल्यांचा निर्णय होईल. – अश्वती दोरजे, (सहपोलीस आयुक्त, नागपूर शहर पोलीस)