अकोला : वर्षातील सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी. यंदा आकाशातही प्रकाशोत्सवाची पर्वणी लाभणार आहे. दोन नवीन धुमकेतू, पाच ग्रह, ग्रह युती आणि मृग नक्षत्रातील उल्का वर्षाच्या घडामोडींनी आकाश दिवाळी साजरी होणार आहे. दिवाळीमध्ये आकाशातील या प्रकाशोत्सवाचा आनंद घेण्याचे आवाहन विश्व भारती केंद्राचे संचालक प्रभाकर दोड यांनी केले.
दिवाळीचे मुख्य आकर्षण म्हणजे प्रकाशाचा सण, ज्यात अंधारावर प्रकाशाचा आणि वाईटावर चांगल्याचा विजय साजरा केला जातो. यासोबतच, घरोघरी पणत्या, आकाशकंदील आणि दिव्यांच्या माळांनी रोषणाई करणे, नवीन कपडे घालणे, रांगोळी काढणे, आणि फराळ व मिठाईची देवाणघेवाण करणे ही दिवाळीच्या आकर्षणाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. दिवाळी अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजय दर्शवते. हा सण आनंद, समृद्धी आणि नवीन सुरुवात यांसारख्या सकारात्मकतेचे प्रतीक आहे. दिवाळीत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांचे पालन केले जाते.
यंदा दिवाळीत आकाशात देखील प्रकाशोत्सव साजरा केला जाणार आहे. लांबलेला पाऊस आता परतला. वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. रात्रीच्या मोकळ्या आकाशात ग्रह तारे आपल्यासाठी नटून सज्ज आहेत. ग्रामीण भागात शेंडे नक्षत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लांब शेपटीच्या लेमन व स्वान या दोन आकाश पाहुण्यांचे आगमन एकत्रित होत असल्याने खगोलप्रेमींसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरेल. अंधाऱ्या भागातून निरीक्षण करणे सोयीचे ठरणार आहे. सूर्यमिलेतील आठ ग्रहांपैकी मंगळ, बुध, गुरु, शुक्र आणि शनी बघण्याची पर्वणी सद्यस्थितीत लाभत आहे. यात रात्रीच्या प्रारंभी पश्चिम आकाशात बुध आणि लाल रंगाचा मंगळ ग्रह, तर पूर्व क्षितिजावर शनी ग्रह सुंदर स्वरूपात दर्शनास खुले असून मध्यरात्रीनंतर पूर्व आकाशात गुरु व शुक्र ग्रह पहाटेच्या गारव्यात स्वागतास तयार आहेत.
२० ऑक्टोबरला पहाटे कन्या राशीत चंद्र आणि शुक्र, तर संध्याकाळी पश्चिमेस बुध व मंगळ ग्रह युती तूळ राशीत बघता येईल. २१ च्या रात्री मृग नक्षत्रातून रात्री ११ नंतर पूर्व आकाशात विविधरंगी उल्का वर्षाव होईल. पहाटे त्यांचा वेग वाढलेला पाहता येणार आहे. अमावास्येच्या अंधाऱ्या रात्री हा अनोखा आकाश नजारा दिवाळीच्या आनंदात भर घालणारा ठरणार आहे, असे प्रभाकर दोड यांनी सांगितले. ऐन दिवाळीमध्ये अवकाशात घडणाऱ्या आकर्षक घडामोडींची मोठी मेजवानीच खगोलप्रेमींसाठी उपलब्ध होणार असल्याने सर्वांना याचे विशेष आकर्षण आहे.