अकोला : दीपोत्सवाच्या काळात अवकाशात् देखील मनमोहक घडामोडींची पर्वणी राहणार आहे. या उत्सवात आकाश सुद्धा सहभागी होत असल्याने या दुहेरी आनंदाचा लाभ घेण्याचे आवाहन विश्वभारती केंद्राचे प्रमुख प्रभाकर दोड यांनी केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

थंडीची चाहूल लागली. पुढील आठवड्यापासून दिवाळी उत्सवाला प्रारंभ होईल. आकाशात देखील विविध घडामोडींची रेलचेल राहणार आहे. सूर्यमालेतील आठ ग्रहांपैकी मंगळ, बुध, गुरु, शूक्र आणि शनी ग्रह नुसत्या डोळ्यांनी पाहता येतात. सध्या संध्याकाळी पश्चिम आकाशात अधिराज्य गाजवणारा तेजस्वी शूक्र ग्रहाजवळ नुकताच बुध ग्रह आला आहे. याच वेळी पूर्व आकाशात वलयांकित शनी ग्रह कुंभ राशीत दिसेल. पहाटे पूर्व आकाशात वरच्या भागात लखलखीत गुरु ग्रह वृषभ राशीत तर मिथुन राशीत लालसर रंगाचा मंगळ असेल. उत्तर, दक्षिण दिशादर्शक तारे रात्रीच्या वेळी दिशा समजून घेण्यास उत्तरेचा ध्रुवतारा आणि दक्षिणेस अगस्त्य तारका सहायक ठरतात. ध्रुवताऱ्याची ओळख करून देण्यात सप्तर्षी व शर्मिष्ठा हे तारका समूह सोबत करतात. पृथ्वीच्या ज्या अक्षवृत्तावर असतो, तेवढ्याच अंशावर क्षितिजापासून ध्रुवतारा दिसतो, असे प्रभाकर दोड यांनी सांगितले.

हेही वाचा…नागपूर पोलिसांकडून वसुलीचा ‘नाईट पॅटर्न’…. रस्त्यावरचे दिवे मालवून…

आकाशगंगेपेक्षा मोठी असलेली देवयानी आकाशगंगा सध्या स्थितीत पूर्व आकाशात डावीकडे नुसत्या डोळ्यांनी पाहता येईल. त्यापासून पृथ्वीचे अंतर सुमारे बावीस लक्ष प्रकाश वर्षे एवढे महाप्रचंड आहे. याचा अर्थ दर सेकंदाला तीन लाख कि.मी.जाणाऱ्या प्रकाशाला पृथ्वीवर यायला बाविस लाख वर्षे लागतील, असे दोड म्हणाले.

दरताशी २८ हजार ५०० कि.मी या प्रचंड वेगाने फिरणारे अंतराळ संशोधन केंद्र दर दीड तासात एक पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करते. आपल्या भागात आल्यावर ते आकाशात फिरत्या चांदणीच्या स्वरूपात बघता येईल. याशिवाय उत्तरेचा ध्रुवतारा सप्तर्षी व शर्मिष्ठा तारका समूहाचे आधारे, शौरी, तिमिंगल, ययाती व देवयानी, सारथी, कालेय, कृत्तिका, हंस, गरूड, मृग आदी तारका समूह अनमोल खजिन्याचे रूपात बघता येतील, असे देखील प्रभाकर दोड यांनी सांगितले.

हेही वाचा…लोकजागर : घराणेशाहीच्या टीकेला ‘घरघर’

आकाशात आतषबाजी

दिवाळी सणाच्या उत्सवात फटाक्यांची आतषबाजी केल्या जाते. प्रकाश उत्सवामध्ये ऑक्टोबरच्या उत्तरार्ध व नोव्हेंबरच्या पूर्वार्धात उल्का वर्षाव होतांना आकाशात दिसेल. विविधरंगी उल्का रात्री १० नंतर पूर्व आकाशात पहाटेपर्यंत पाहता येतील. उल्का धुमकेतूचे वस्तूकण आहेत. ते गुरुत्वाकर्षणाने पृथ्वी कक्षेत येऊन वातावरणात पेट घेतल्याने लाल, पिवळ्या, निळ्या पांढऱ्या रंगाच्या प्रकाशरेषा दिसतात, असे दोड म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diwali is in next week there will be various events in sky as well ppd 88 sud 02