भंडारा : लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली असून आता निकालाचीही प्रतीक्षा मंगळवारी (ता. ४) संपणार आहे. देशात कुणाची सत्ता येणार, राज्यात कोण बाजी मारणार, याचे अंदाज एक्झिट पोलने बांधले जात आहेत. मात्र, हे एक्झिट पोल जनतेचे नसून ते भाजप प्रणित आहेत, एक्झिट पोल सायकॉलॉजिकल वारफेअर असल्याची टीका भंडारा गोंदिया मतदार संघाचे महाविकस आघाडीचे उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भंडारा-गोंदिया हा राष्ट्रवादीचे दिग्गज नेते प्रफुल पटेल आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ह्या दोन्ही मातब्बर नेत्यांचा मतदारसंघ असल्याने संपूर्ण विदर्भाचे नव्हे तर महाराष्ट्राचे लक्ष या मतदारसंघाकडे लागले आहे. नाना पटोले यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसचे उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे यांना उमेदवारी देण्यात आली होती. विशेष म्हणजे या मतदारसंघात तब्बल २५ वर्षानंतर निवडणुकीत पहिल्यांदा इव्हीएम मशीनवर पंजा हे निवडणूक चिन्ह पाहायला मिळत असल्याने ही निवडणूक अधिक चुरशीची झाली. शेवटच्या टप्प्यातील मतदानसोबतच रणधुमाळी संपली आणि आता उद्या खासदारकीची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.

आणखी वाचा-अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्या सुटकेबाबतच्या निर्णयाला ‘सर्वोच्च’ न्यायालयाची स्थगिती…

अवघ्या काही तासात मतमोजणीला सुरुवात होणार असल्याने उद्या कोण बाजी मारणार? या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. त्यातच एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. त्यानुसार भंडारा गोंदिया मतदार संघात महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे विजयी होतील असे एक्झिट पोलमध्ये समोर आले आहे. तर यावरून आता अनेक दावे-प्रतिदावे केले जात असतानाच महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी भाजपवर सडकून टीका करत हा एक्झिट पोल म्हणजे भाजपचा ‘सायकॉलॉजिकल वारफेअर’ असल्याचे म्हटले आहे.

ते म्हणाले की, निवडणूक जिंकण्यासाठी भाजप नेहमीच साम, दाम, दंड, भेदाचा वापर करीत असते. एक्झिट पोल सुध्दा त्याचाच एक भाग आहे. हा एक्झिट पोल म्हणजे भाजपने तयार केलेला निव्वळ एक चक्रव्ह्यू आहे. अशाप्रकारे एक्झिट पोलचे आकडे दाखवून आमच्या कार्यकर्त्यांना आणि बूथ पोलिंग एजंटला भ्रमित करायचे काम भाजप करीत आहे. जेणेकरून आमचे कार्यकर्ते नैराश्यात जातील आणि बूथ वरून त्यांचे लक्ष विचलित होईल. आणि हीच संधी साधून भाजप नेहमीप्रमाणे घात करेल करेल असा आरोपही डॉ. पडोळे यांनी केला आहे. मात्र भंडारा गोंदियातच काय तर महाराष्ट्रात आणि देशातच महाविकास आघाडीचा विजय होणार असल्याचा विश्वास त्यांनी बोलून दाखविला.

आणखी वाचा-अमरावतीत झळकले नवनीत राणा यांच्‍या विजयाचे फलक!

भंडारा गोंदिया मतदार संघात कोण बाजी मारणार याबाबत अजूनही संभ्रमावस्था आहे. येथे खासदारकीची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याचा अंदाज बांधण्यात सर्वच ‘चाणक्य’ चक्रावले आहेत. अशातच एक्झीट पोलनुसार भंडारा गोंदिया मतदार संघात महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे विजयी होतील अशा चर्चांना ऊत आले. त्यामुळे उद्या होणाऱ्या मतमोजणीपूर्वीच जिल्ह्याचे वातावरण तापले आहे. मात्र २०२४ चा निकाल ऐतिहासिक राहणार असल्याचा विश्वास काँग्रेसचे नवखे उमेदवार प्रशांत पडोळे यांनी व्यक्त केला आहे. सुनील मेंढे यांनी खासदार असताना कोणतीही कामे केली नाहीत त्यामुळे जनता त्यांच्यावर नाराज आहे आणि हे निकालानंतर स्पष्ट होईलच असा असेही ते म्हणाले. सोबतच आपल्या विजयाची खात्री दर्शवत ५ जून रोजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्य महाराष्ट्र विजयाचं विषेश गिफ्ट देणार असल्याचा दावाही केला.

लोकसभा निवडणूक निकालाला आता अवघे काही तास उरले आहेत. भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघांसाठी १९ मे रोजी मतदान पार पडले. या मतदार संघात १८ उमेदवार रिंगणात होते; मात्र खरी लढत भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच होती. भाजपचे उमेदवार खासदार सुनील मेंढे यांच्या नशिबात पुन्हा राजयोग येणार की यावर पुढील पाच वर्षांची गणित जुळवली जात आहेत. जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते खा. प्रफुल पटेल यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे त्यामुळे येथील जनता या दोघांपैकी कोणाला कौल देते हेही उद्या स्पष्ट होणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr prashant padole says exit poll is not by the people but by bjp ksn 82 mrj