बुलढाणा : सह्यांद्रीच्या कणखर देशा अशी पूर्वापार ख्याती असलेल्या महराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणजे कळसुबाईचे शिखर होय.या ठिकाणी पाय ठेवण्याआधी अर्थात शिखर चढण्या आधी भलेभलेही दहा वेळा विचार करतात. मात्र बुलढाणा जिल्ह्यातील परडा ( तालुका मोताळा ) या आडवळणावरील गावातील एकदोन नव्हे तब्बल १८ विध्यार्थ्यांनी हे शिखर सर करण्याचा भीम पराक्रम केला.

परडा येथील चेतना विकास विद्यालयाच्या वर्ग सहावी, सातवी आणि आठवीच्या जेमतेम १२ ते १४ वयोगटातील तब्बल १८ विद्यार्थ्यांनी ५४०० फूट उंच असलेले हे शिखर कोसळधार पावसात पादाक्रांत केले आहे. या आव्हानात्मक मोहिमेत शाळेचे आठ शिक्षक देखील सहभागी झाले होते. महाराष्ट्रातील सुपरिचित गिर्यारोहक, पक्षी निरीक्षक, निसर्ग छायाचित्रकार राजपालसिंग राजपूत यांचे विशेष मार्गदर्शन या शैक्षणिक सहलीला लाभले.

ग्रामीण भागातील काटक व परिश्रमी विद्यार्थ्यांनी या शैक्षणिक सहलीमध्ये आपले जेवण सुद्धा स्वतःच बनविले हे विशेष.सध्याच्या संगणक व माहिती जालाच्या युगात टीव्ही, मोबाईल, कार्टून, व्हिडिओ गेम मध्ये अडकलेली पिढी आपण पाहतो आहोत. क्रीडागंण, मैदान ओस पडली, विध्यार्थी खेळाकडे दुर्लक्ष करतात. मात्र पालकांची संमती आणि शिक्षकांचे नेतृत्व असेल तर अगदी लहान वयात सुद्धा मुलं मोठं साहस करतांना दिसतात. फक्त त्यांना हवी असते संधी. अशीच संधी मुख्याध्यापिका आकांक्षा मोठे यांनी आपल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहलीच्या माध्यमातून दिली. भंडारदरा धरण, नाशिक येथील ऐतिहासिक काळाराम मंदिर, पंचवटी, आणि निसर्ग रम्य सांधन व्हॅली या ठिकाणांना भेटी देत, विद्यार्थ्यांनी माहितीचे संकलन केले. पावसाळ्यामध्ये अनुभवाला येणारी जैवविविधता सुद्धा विद्यार्थ्यांनी अभ्यासली.

या बालशूरांचा सहभाग

या मोहिमेत वर्ग आठवी मधील स्वीकृती मोठे, रोशनी पवार, यश धनवटे, आर्यन पवार, प्रणाली चव्हाण, वर्ग सातवी मधील अन्वयी तांबेकर, शुभम कुऱ्हाडे, मनोज चव्हाण, आर्यन सुरडकर , पवन भागवत, सार्थक गुजर तर वर्ग सहावी मधील धनश्री राजनकर , माहेश्वरी उबाळे , श्रद्धा भारंबे ,शिवानी राठोड, संस्कार भालेराव, नैतिक वखरे, समर्थ मोरे हे सहभागी झाले. यात विद्यार्थिनींचा लक्षणीय सहभाग होता. यामुळे या सर्वांचे पालक देखील अभिनंदनास पात्र आहेत.