वर्धा: भलेही निष्ठावंत कार्यकर्त्यांची कदर होत नसेल पण त्याची आठवण मात्र कायम ठेवल्या जाते, असे राजकीय निपुण म्हणतात. आज तसेच झाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पालकमंत्री डॉ. पंकज राजेश भोयर यांच्या कार्यक्रमास वर्ध्यात आले. कार्यक्रम आटोपला आणि शिंदे यांचा ६०, ७० गाड्यांचा ताफा अचानक वळता झाला. पोलीस व प्रशासन यांना ही वेळेवरील भेट कुठे हे माहित होते. पण सामान्य नागरिकांना हा सायरन वाजवीत निघालेला ताफा कुठे निघाला, याची कल्पनाच नव्हती. आडवळणावर एका छोट्या घरी शिंदे ताफा पोहचला आणि शेजारी म्हणू लागले याला म्हणतात पुण्याई.

अनेक तपापासून सेनेशी जुळलेले व खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद मिळालेले रविकांत बालपांडे राजकीय विजनवासात. होते सेनेतच पण अंतर ठेवून निष्ठा उशाशी घेऊन राहणारे. सेनेची शकले पडली तरी बालपांडे मातोश्रीला बिलगून राहले. मात्र ईथे कायम उपेक्षा. साधी भेट दुर्मिळ. म्हणून मग मोठा चाहता वर्ग असलेल्या बालपांडे यांनी अखेर शिंदे सेनेत प्रवेश करण्याचा निर्णय काही अटी ठेवून घेतला. रवी आपल्यासोबत हवाच, असा शिंदे गटाच्या नेत्यांचा हट्ट. तो शिंदे यांनी पूर्ण केला. मर्जीतील जिल्हाप्रमुख झाले आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांचा वर्धा दौरा ठरला.

वर्धा दौऱ्यात एकच शासकीय कार्यक्रम होता. त्यामुळे शिंदे यांची भेट घेण्यास उत्सुक त्यांचे समर्थक बालपांडेकडे भेटीसाठी तगादा लावत होते. ही घडामोड लोकसत्ता ऑनलाईनने टिपली. त्याची दखल शिंदे कार्यालयाने तसेच शिंदे सेनेचे पूर्व विदर्भ समन्वयक आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी घेतली. त्यांचा बालपांडे यांना फोन. चरखागृह येथील कार्यक्रम आटोपताच शिंदे म्हणाले, अरे रवीकडे जायचे नं! बालपांडे यांच्या घरी पोहचताच शिंदे यांनी विचारपूस सूरू केले. या घरी बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा व अस्थीकलश मुख्यभागी ठेवलेला आहे. तिथे हार पण मांडून ठेवले आणि कार्यकर्ते प्रतीक्षेत. ते पाहून शिंदे म्हणाले अरे, समजलो मी. लगेच या अस्थीकलशास त्यांनी फुले अर्पण करीत अभिवादन केले. त्यानंतर उपस्थित सेना सैनिकांनी आपली फोटो काढण्याची हौस भागवून घेतली.

लोकसभा क्षेत्रप्रमुख ही जबाबदारी मिळालेले रविकांत बालपांडे म्हणाले की शासकीय दौरा असल्याने भेट मिळण्याबाबत शंका होती. आम्ही निरोप दिला होता. पण भेट पक्की झाली ती लोकसत्ता ऑनलाईनने केलेल्या बातमीमुळे. ती शिंदे यांच्या कार्यालयाकडे व भोंडेकर यांच्यापर्यंत गेली आणि भेट निश्चित होण्याचा मार्ग मोकळा झाला. आमदार भोंडेकर यांनी मला तसे सूचित केले होते. पण निश्चित नव्हते. मी तयारी करून ठेवली. अखेर सेवाग्राम येथील कार्यक्रमात घरून निरोप आला. घरी पोलीस तपासणी करीत आहे. सार्थकी लागल्याची भावना झाली. शिंदे साहेबांनी विचारपूस करीत सर्व ते सहकार्य करण्याची हमी दिली, असे बालपांडे सांगतात. या भेटीत नरेंद्र भोंडेकर,जलसंपदामंत्री संजय राठोड,आरोग्य राज्यमंत्री प्रकाश आबिटकर,मा.राज दीक्षित, समन्वयक मा.बंडू तागडे , जिल्हाप्रमुख सर्वश्री राजेश सराफ, प्रशांत शहागडकर, बाळा मिरपूरकर प्रामुख्याने उपस्थित होते.