नागपूर : केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी ‘गुजरात पाकिस्तानचा भाग नाही’ असे विधान करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘जय गुजरात’ वक्तव्याचे समर्थन केले. केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या पुणे दौ-यात गुजराती समाजाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषणाच्या शेवटी ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘ जय गुजरात’ असे म्हटले होते. त्याचे तीव्र पडसाद राजकीय वर्तुळात उमटले. हिंदी सक्तीवरून मुंबईत मराठी जनमानस संतप्त असताना त्यात एकनाथ शिंदे यांनी ‘ जय गुजरात’ म्हणने याचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने फायदा घेत शिंदेवर टीकेची झोड उठवली. त्यात रविवारी शिंदे गटाचे केंद्रीय मंत्री व बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी शिंदे यांच्या ‘ जय गुजरात’ वक्तव्याचे जोरदार समर्थन केले.

काय म्हणाले जाधव

संयुक्त महाराष्ट्र असताना गुजरात- महाराष्ट्र एकत्र होतो. मुंबई ही गुजरातची देखील राजधानी होती. मुंबईमध्ये देखील मोठ्या प्रमाणात गुजराती राहतात. गुजरात हा काही पाकिस्तानचा प्रांत नाही. आपल्याच शेजारचे राज्य आहे, अशा गोष्टीचे राजकारण करायला नको”, या शब्दात केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जय गुजरात वक्तव्याचे समर्थन केले. ते म्हणाले, “सामाजिक कार्यक्रमात आम्हाला बोलावल्यावर आपला स्वाभिमान ठेवत दुस-याचा स्वाभिमान जागृत करण्याचा प्रयत्न आम्ही करतो. त्यामुळे एकनाथ शिंदेंनी केलेलं वक्तव्य चुकीचं नाही”, शिवाजी पार्क वरून बाळासाहेब ठाकरे तमाम हिंदू बांधवांनो म्हणायचे, उद्धव ठाकरे ते विसरले. त्यांनी हिंदुत्व का सोडलं? याबाबत कोणी विचारत नाही. दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं पण आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही, या म्हणीप्रमाणे त्यांची अवस्था झाली”, असे प्रतापराव जाधव म्हणाले. तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

आदित्य ठाकरेंची जाधवांवर टीका

प्रतापराव जाधव यांच्या वक्तव्यावर आमदार आदित्य ठाकरे यांनी टीका केली . “ते कुठल्या पक्षात आहेत? आणि त्यांच्यावर पक्ष कारवाई होणार का? दुसरं म्हणजे त्यांच्या नेत्यांनी जय गुजरात हे पुण्यात म्हटलं आहे. कुठे काय चाललं आहे. आज भाजपने मराठी माणसाची तुलना पाकड्यांबरोबर केली आहे. म्हणजे किती मराठी आणि महाराष्ट्र माणसाबद्दल भाजपच्या मनात द्वेष आहे. ते ज्या पहलगाम हल्ल्यातीस दहशतवाद्यांना पकडू शकले नाहीत त्या पाकड्यांची तुलना तुम्ही मराठी माणसाशी करता? खरंतर तुम्ही महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे. महाराष्ट्राचा खरा शत्रू हा भाजप आहे”, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या भाषणाच्या शेवटी जय गुजरात म्हटल्याने वाद निर्माण झाला आहे. पण एकनाथ शिंदे यांनीदेखील माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा गुजरातमधील २०१९ चा व्हिडीओ दाखवला आहे. या व्हिडीओत उद्धव ठाकरे जय गुजरात म्हणताना दिसत आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूने टीका-टीप्पणी सुरु आहे.