अकोला : अकोला महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नव्याने आरक्षण काढण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. नागरिकांचा मागास वर्ग महिला व सर्वसाधारण महिलांचे नव्याने आरक्षण काढले जाईल. नव्याने आरक्षण काढून मंजुरीसाठी सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. या आदेशामुळे महापालिकेसह राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून समीकरणामध्ये बदल होण्याची चिन्हे आहेत.
महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी प्रमिलाताई ओक सभागृहात आरक्षण सोडत काढण्यात आली. २० प्रभागांतून ८० सदस्यांचे आरक्षण काढण्यात आले. ८० पैकी १४ अनुसूचित जाती, दोन अनुसूचित जमाती, नामाप्र २१ व सर्वसाधारण गटांसाठी ४३ जागा आरक्षित आहेत. त्यामध्ये महिलासांठी अनुसूचित जातीच्या सात, अनुसूचित जमाती एक, नामाप्र ११ आणि सर्वसाधारण महिलांसाठी २१ अशा ५० टक्के म्हणजेच ४० जागा महिलांसाठी आरक्षित निघाल्या. आरक्षण निश्चित झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आले होते.
आरक्षणातील अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती व नामाप्र प्रवर्ग सोडतीद्वारे निश्चित केलेले आरक्षण राज्य निवडणूक आयोग यांनी कायम ठेऊन नामाप्र व सर्व साधारण महिलांचे आरक्षण पुन्हा सोडतीद्वारे निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी शासनाने २० मे २०२५ रोजी प्रसिद्ध केलेल्या तरतुदीमधील नियम ६ (३) व ६ (४) नुसार नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग महिला व सर्व साधारण महिला यांचे आरक्षण निश्चित करून राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी तत्काळ पाठविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग महिला व सर्व साधारण महिला यांचे आरक्षण थेट व सोडत पद्धतीने निश्चित करण्यासाठी १७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता अकोला महानगरपालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुख्य सभागृह येथे सोडत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मतदार यादीचा सुधारित कार्यक्रम
राज्य निवडणूक आयोगाने समक्रमांकाच्या ०४ नोव्हेंबर रोजीच्या पत्रान्वये दिलेला मतदार यादीचा कार्यक्रम पुन्हा सुधारित करण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेल्या तारखेस अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या मतदार यादीवरुन महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी तयार केलेली प्रारुप मतदार यादी, हरकती व सूचना मागविण्यासाठी प्रसिद्ध करण्याची दिनांक २० नोव्हेंबर आहे. प्रारुप मतदार यादीवर हरकती व सूचना २७ नोव्हेंबरपर्यंत दाखल करता येईल. प्रारुप मतदार यादीवर दाखल हरकतीवर निर्णय घेऊन प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या अधिप्रमाणित करून ५ डिसेंबर रोजी प्रसिद्ध केल्या जातील. मतदान केंद्रांच्या ठिकाणी ८ डिसेंबरला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मतदान केंद्रनिहाय मतदार यादी १२ डिसेंबरला प्रसिद्ध होणार आहे.
