नागपूर : अन्न व औषध प्रशासन विभागातून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून व अन्नपदार्थ उत्पादकांना परवाना निलंबनाची भीती दाखवून त्यांच्याकडून वसुली केली जात असल्याची धक्कादायक माहिती पीडित व्यावसायिकांकडून प्राप्त झाली आहे. या प्रकरणात काहींना तडजोडीसाठी मंत्र्यांच्या निवासस्थानी बोलावले जात असल्याचीही तक्रार आहे.

राज्याच्या अन्न व औषध खात्यात सुरू असलेला गैरव्यवहार ‘लोकसत्ता’ने चव्हाट्यावर आणल्यानंतर या खात्यातील भ्रष्टाचाराच्या अनेक सुरस कथा समोर येऊ लागल्या आहेत. वसई, भिवंडी, नवी मुंबईसह राज्यातील इतर भागातील खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी यासंदर्भात दिलेली माहिती धक्कादायक आहे. नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर वसईतील दुग्धजन्य पदार्थाचे उत्पादक म्हणाले, आमच्याकडे अन्न व औषध प्रशासन विभागाने केलेल्या तपासणीत काही त्रुटी आढळल्या. त्या दूर केल्यावर काही दिवसांनी या विभागातील निवृत्त अधिकारी आमच्याकडे आले. जुनी ओळख दाखवत त्यांनी व्यवसायाचा परवाना निलंबित होण्याची शक्यता वर्तवली. तडजोडीसाठी मंत्र्यांच्या निवासस्थानी जाण्याचे संकेत दिले. आता आम्ही या विभागाकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून व्यवसाय इतर राज्यात हलवण्याबाबत चाचपणी करीत आहोत, असेही या व्यावसायिकाने सांगितले.

हे ही वाचा… नागपूर : ‘लाडक्या बहिणी’च्या सुरक्षेसाठी ‘या’ मार्गांवर राहणार बंदी…

भिवंडीतील एका अन्य व्यावसायिकानेही त्याच्यासोबतही असाच प्रकार घडल्याची माहिती दिली. तो म्हणाला, आमच्याकडे निवृत्त अधिकाऱ्यांसोबत काही विद्यमान अधिकारीही तपासणीसाठी आले होते. त्यांना त्रुटी आढळल्यावर परवाना तात्पुरता निलंबित करण्यात आला. त्रुटी दूर केल्यावर परवाना पुन्हा पुनर्जीवित झाला. मात्र या अधिकाऱ्यांनी कायमस्वरूपी परवाना निलंबनाची भीती दाखवत तडजोडीसाठी मंत्र्यांच्या निवासस्थानी भेटीला बोलावले. नवी मुंबईतील एका व्यावसायिकानेही असा प्रकार नेहमी घडत असल्याचे सांगितले. ठाणे येथील एक वादग्रस्त पोलीस कर्मचाऱ्यांमार्फतही व्यावसायिकांना खंडणीसाठी छळले जात असल्याची तक्रार आहे.

स्पाईस मॅन्युफॅक्चरिंग एक्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष संजय अवारे म्हणाले, नवी मुंबईतील काही मसाला व्यावसायिकांकडून तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. भिवंडीतील राजू सतारदेकर म्हणाले, कच्चा माल जप्त करून मुदतबाह्य होईपर्यंत तो अडकवण्याची धमकी काही निवृत्त अधिकाऱ्यांकडून देण्यात आली होती. आम्ही याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांना सांगितले.

हे ही वाचा… कारण राजकारण: तिवसा मतदारसंघात ‘यशा’साठी भाजपची पराकाष्ठा

“वरील प्रकरणाशी अन्न व औषध प्रशासन विभागाचा काहीही संबंध नाही. आमच्या कार्यालय व निवासस्थानात कोणालाही बोलावले जात नाही. काहीही अनुचित होत नाही. जर कुणी अवैध कृत्य करीत असेल तर त्याच्यावर कडक कारवाईच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. कुणीही खासगी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये.” – धर्मरावबाबा आत्राम, मंत्री, अन्न व औषध प्रशासन.