नागपूर : राज्य शासनातर्फे आयोजित ‘लाडकी बहीण योजना’ संदर्भातील कार्यक्रमामुळे शनिवारी रेशीमबाग व क्रीडा चौक परिसरात दिवसभर वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला लाखो महिला येण्याची शक्यता असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून याबाबत दिशानिर्देश जारी करण्यात आले आहे. मात्र यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होणार असून आजुबाजूच्या भागात मोठी कोंडी होण्याची शक्यता आहे.

शनिवारी रेशीमबाग मैदानावर सकाळी सहा ते रात्री आठ या कालावधीत लाडकी बहीणसंदर्भातील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला लाखो महिला पोहोचतील असे नियोजन करण्यात आले आहे. वाहतूक पोलिसांनी संभाव्य वाहतूक कोंडी लक्षात घेता अधिसूचना जारी केली. त्यानुसार सात प्रमुख मार्गांवर वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. पहाटे पाच ते कार्यक्रम संपेपर्यंत ही प्रवेशबंदी असेल असे वाहतूक उपायुक्त शशिकांत सातव यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा : कारण राजकारण: तिवसा मतदारसंघात ‘यशा’साठी भाजपची पराकाष्ठा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या मार्गांवर राहणार बंदी

  • सीपी ॲंड बेरार कॉलेज ते आवारी चौक ते क्रीडा चौक
  • क्रीडा चौक ते आवारी चौक ते सीपी ॲंड बेरार कॉलेज
  • अशोक चौक ते अप्सरा चौक ते भोला गणेश चौक
  • भोला गणेश चौक ते अप्सरा चौक ते अशोक चौक
  • अशोक चौक ते आवारी चौक ते सक्करदरा चौक
  • सक्करदरा चौक ते अशोक चौक
  • केशवद्वार ते गजानन महाराज चौक

८६८ बसेसने महिला येणार

या कार्यक्रमासाठी नागपूर जिल्ह्यातूनच ८६८ बसेसने महिला पोहोचणार आहेत. यात जवळपास सर्वच तालुक्यांतील महिलांचा समावेश असेल. तर नागपूर शहरातील महिलांसाठी ३११ बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात बसेस आल्यावर त्यांच्या पार्किंगची अडचण येईल व शहरातील इतर भागांतदेखील वाहतूकीची मोठी कोंडी होण्याची शक्यता आहे.