अकोला : नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित गरबा खेळण्यासाठी आई गेली होती. त्याच वेळी घरात झोपलेल्या पाच वर्षात चिमुकल्या मुलीवर ४० वर्षीय नराधम बापाने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना अकोला शहरातील खदान पोलीस ठाण्यांतर्गत घडली. या प्रकरणात खदान पोलिसांनी नराधम आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकल्या आहेत. नात्याला काळिमा फासणाऱ्या या धक्कादायक घटनेमुळे मोठी खळबळ उडाली. आरोपीविषयी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

समाजामध्ये महिला, तरुणी व चिमुकल्या मुलींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. आता तर घरात देखील मुली सुरक्षित नसल्याचे अकोल्यातील घटनेवरून समोर आले आहे. शहरातील खदान पोलीस ठाण्यांतर्गत राहणारी एक महिला रविवारी रात्री मुलांना घरी झोपवून एकटीच परिसरात गरबा खेळण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिचा पती घरीच होता. यावेळी गाढ झोपेत असलेल्या चिमुकल्या मुलीवर सावत्र बापाने लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर मुलीच्या पोटात दुखत होते. यावरून विचारणा केल्यावर पीडित मुलीने आईला घडलेला सर्व प्रकार सांगितला. हा सर्व संतापजनक प्रकार ऐकून आईच्या पायाखालची वाळूच सरकली. सावत्र बापाच्या गैर कृत्याचा मोठा धक्का महिलेला बसला. प्रकृती बिघडलेल्या पाच वर्षीय चिमुकलीला शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. सध्या तिची प्रकृती स्थिर आहे. सोमवारी सायंकाळी महिलेने खदान पोलीस ठाणे गाठले. या प्रकरणाची तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता तत्काळ पथके रवाना करून नराधम सावत्र बापाला अटक केली.

पती-पत्नीचे दुसरे लग्न

नराधम सावत्र बापाने चिमुकल्या पाच वर्षे मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेने समाज मन सुन्न झाले आहे. या प्रकरणातील पती-पत्नीचे हे दुसरे लग्न आहे. पहिल्या पतीपासून महिलेला एक मुलगी आहे. लग्नानंतर त्यांना एक मुलगाही झाला. मुलगा, मुलगी, पती व पत्नी असे सर्वजण एकत्रित राहत होते. पती मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. रविवारी रात्री महिला बाहेर गेल्यावर नराधम बापाने सावत्र मुलीवर अत्याचार केले. या प्रकरणात पीडित मुलीने या अगोदरही तिच्यावर सावत्र बापाने अत्याचार केल्याचे सांगितले आहे. नात्याला काळिमा फासणाऱ्या या नराधम आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.