नागपूर : ही दोस्ती तुटायाची नाय या गाण्याचे बोल आजही अनेक मित्रांच्या ओठांवर असतात. खऱ्या अर्थाने माणसाच्या आयुष्यात मित्रांचे स्थान अढळ असते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होणारे हे पाच मित्र.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यात विशेष काय, या पाच मित्रांनी सोबत राहून, एकत्र अभ्यास करून एकाच वर्षी स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून यश मिळवत मैत्रीचा नवा आदर्श घालून दिला आहे. असे म्हणतात की चांगल्या मित्रांची सोबत आलेला आयुष्यातून कोणत्याही संकटावर मात करायला शिकवते. विविध भागांतून एकत्र आलेल्या आकाश दिपक बोढारे, अनिल भिमराव बत्तीशे, राहुल नानासाहेब पवार, राकेश कैलास निकम आणि शुभम नंदकुमार निकम या मित्रांनी मैत्री काय असते, काय करू शकते, हे या यशातून दाखवून दिले आहे. या पाचही मित्रांनी एका अभ्यासिकेत दिवस रात्र एक करून, एकमेकांना मार्गदर्शन करून आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून यश संपादन केले आहे.

हेही वाचा – मोदी सरकार पुन्हा सत्तेत येण्यासाठी भाजपकडून अथर्वशीर्ष पाठ, मंत्रजप

आकाश दिपक बोढारे हा चांदवड तालुक्यातील शिंदे भयाळे येथील असून त्याचे माध्यमिक शिक्षण शिंदे येथीलच जनता विद्यालयात झाले आहे. तर महाविद्यालयीन शिक्षण हे नाशिकच्या केटीएचएम महाविद्यालयातून झाले आहे. आकाश याने २०१८ पासून स्पर्धा परीक्षांची तयारीची सुरुवात केली. आकाशने आता आकाशाला गवसणी घातली असून राज्यकर निरीक्षक आणि मंत्रालय क्लर्क अशा दोन जागांवर त्याची निवड झाल्याने सर्वच स्तरावर त्याचे कौतुक होत आहे. तसेच अनिल भिमराव बत्तीशे हादेखील आकाश बोढारेच्या गावचाच असून अनिलनेदेखील त्याचे माध्यमिक शिक्षण शिंदे येथीलच जनता विद्यालयात पूर्ण केले आहे.

अनिल आणि आकाश या दोघांनी सोबतच अभ्यासाला सुरवात केली. विशेष म्हणजे अनिलनेदेखील दोन परीक्षा उत्तीर्ण केल्या असून आता तो पोलीस उपनिरीक्षक किंवा मंत्रालय क्लर्क या दोन पोस्टपैकी एकाची निवड करणार आहे. तिसरा राहुल नानासाहेब पवार हा नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील करंजगाव येथील आहे. राहुलने अभ्यासाची सुरवात दोन वर्षांपूर्वी केली होती. सातत्य, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर राहुलनेदेखील दोन परीक्षांमध्ये घवघवीत यश मिळवले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सलग दोन वर्षे २०२१ आणि २०२३ मध्ये मंत्रालय मुंबई येथे निवड झाली आहे. राहुलचे कुटुंबीय आणि ग्रामस्थांकडून खूप कौतुक होत आहे. तसेच राकेश कैलास निकम आणि शुभम नंदकुमार निकम हे दोन मित्र दिंडोरी तालुक्यातील मोहाडी गावातील रहिवासी आहे. राकेशदेखील दोन पदांची परीक्षा उत्तीर्ण झाला असून मुंबई मंत्रालयात क्लर्क आणि कर सहाय्यक पदासाठी त्याची निवड झाली आहे. तर शुभम नंदकुमार निकम याची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मंत्रालय क्लर्क म्हणून निवड झाली आहे.

हेही वाचा – नागपूर : “उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळावा, अन्यथा सोमवारपासून अन्नत्याग करणार”, ओबीसी आक्रमक

या पाचही मित्रांवर कौतुकाचा वर्षाव होत असून मित्र सोबत असले तर माणूस कोणत्याही संकटाचा अडथळा यशस्वी पार करू शकतो याचा आदर्श या मित्रांनी घालून दिला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Five friends passed mpsc exam dag 87 ssb