नागपूर : वनखात्यातील वनरक्षक पदाच्या भरतीप्रक्रियेदरम्यान सुरू असलेल्या शारीरिक चाचणीत अव्यवस्था होती, असा आरोप उमेदवारांनी केला आहे. वनखात्यात खालच्या फळीतील कर्मचारी भरतीसाठी बऱ्याच वर्षांनंतर प्रक्रिया राबवली जात आहे. ऑगस्ट-सप्टेंबर २०२३ या कालावधीत लेखी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. या पडताळणीनंतर निवड झालेल्या उमेदवारांची शारीरिक चाचणी मिहान परिसरात सुरू आहे. त्यासाठी राज्यातून सुमारे ६० हजार उमेदवार पात्र ठरले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर येथे सुमारे ३० हजार उमेदवारांची शारीरिक चाचणी होत आहे. या परीक्षेत कोणताही गोंधळ होऊ नये म्हणून वनखात्याकडून ‘रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटीफिकेशन’चा वापर केला जात आहे. पोलीस विभागात भरतीसाठी याच प्रक्रियेचा वापर केला जातो. सकाळी सहापासून या चाचणीला सुरुवात होते. मात्र, उन्हामुळे सकाळी आणि सायंकाळी अशा दोन सत्रांत होत आहे. बुधवारी पहिला दिवस असल्याने नोंदणी आणि इतर प्रक्रियेत वेळ गेल्यामुळे चाचणीसाठी वेळ दिलेल्या काही उमेदवारांची चाचणी होऊ शकली नाही. त्यांना गुरुवारी बोलावण्यात आले आहे. जवळपास ३० हजार उमेदवार असल्याने त्यांची कागदपत्रे तपासून त्यांना चाचणीसाठी तयार करणे, उन्ह जास्त असल्यामुळे त्यांना बसवून ठेवणे आणि उन्ह कमी झाल्यानंतर त्यांना चाचणीसाठी बोलावणे या पद्धतीने ही प्रक्रिया राबवली जात आहे. मात्र, यात सहभागी अनेक उमेदवारांनी या प्रक्रियेत अव्यवस्था असल्याचा आरोप केला आहे. अनेक उमेदवारांसोबत त्यांचे पालक आले आहेत. त्यांना दूर बसवून ठेवण्यात आल्याने भरती प्रक्रियेत गोंधळ असल्याची ओरड केली जात आहे. या पालकांनी गुरुवारी आक्रमक पवित्रा घेतला. परंतु, ही प्रक्रिया ऑनलाईन आणि पारदर्शकपणे होत असून यात कोणताही मानवी हस्तक्षेप नसल्याचे वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी पटवून सांगितल्यानंतर पालक शांत झाले.

हेही वाचा – ..अन् मनोहर जोशींचे विरोधी पक्षनेते पद गेले, काय घडले होते नागपूर अधिवेशनात ?

हेही वाचा – मुख्यमंत्री असताना मनोहर जोशी यांना ‘या’ योजनेचा आनंद अन् दुःखही, गडकरींनी सांगितला होता किस्सा

महाराष्ट्रासह इतर राज्यातील वनखात्यानेही याच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. यात कोणतीही गडबड नाही. अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे शारीरिक चाचणीअंतर्गत धावण्याची शर्यत पूर्ण होताच किती वेळात दिलेले अंतर कापले हे कळते. आम्ही वनखात्याच्या इतर अधिकाऱ्यांनाच येथे येऊ देत नाही. त्यामुळे उमेदवारांसोबत आलेल्या पालकांनासुद्धा आम्ही दूर बसवून ठेवले आहे. मुलींची विशेष काळजी घेतली जात आहे. – श्रीलक्ष्मी ए., मुख्य वनसंरक्षक, नागपूर वनविभाग.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Forest guard recruitment process in forest department allegation of irregularities in physical examination rgc 76 ssb
First published on: 23-02-2024 at 11:50 IST