नागपूर: शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या राजकीय जीवनात घडलेल्या अनेक घडामोडींमध्ये नागपूर अधिवेशनातील घडामोडींचा समावेश आहे. जोशींच्या निधनामुळे या सर्व घडामोडींची आठवण ताजी झाली आहे. यापैकी एक आठवण म्हणजे जोशींचे विरोधी पक्षनेते पद जाणे, त्यांनी तत्काळ आपले सरकारी वाहन सोडणे आणि ऑटोने प्रवास करणे. याची त्यावेळी खूप चर्चा झाली होती.

१९९१ मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक होते. विरोधी पक्षनेते म्हणून शिवसेनेचे त्यावेळचे नेते मनोहर जोशी यांची निवड झाली होती. जोशींच्या निवडीमुळे शिवसेनेतील त्यावेळचे दुसरे नेते छगन भुजबळ नाराज होते. अशातच नागपूरचे हिवाळी अधिवेशन आले. हे अधिवेशन म्हणजे राजकीय घडामोडींचे केंद्र अशी त्याची ओळख. नेहमी प्रमाणे जोशी विरोधी पक्षनेते म्हणून सभागृहात आले. मात्र दुसरीकडे भुजबळ यांचा गट वेगळ्याच कामात व्यस्त होता. भुजबळ त्यांच्या सहकारी आमदारांना घेऊन बाहेर पडले आणि कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. भुजबळांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे शिवसेनेचं संख्याबळ घटलं. तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टीच्या आमदारांचं संख्याबळ वाढलं. पण एक दोन आमदार कमी पडत होते. विरोधी पक्षनेते म्हणून गोपीनाथ मुंडे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती. तेव्हा तत्कालीन सांसदीय कामकाज मंत्री विलासराव देशमुख यांनी त्यांचे मित्र मुंडे यांना मदत केली. मधुकरराव चौधरी विधानसभेचे अध्यक्ष होते. सभागृहात गोंधळ सुरू झाला. गोंधळातच चौधरी यांनी मुंडे यांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर विलासराव देशमुख यांनी मुंडे यांना मनोहर जोशींच्या जागेवर उभं केलं. त्यावेळी मनोहर जोशी वेलमध्ये चर्चेवर वाद घालत होते. त्यांनी वळून मागे बघितलं तेव्हा मुंडे त्यांच्या जागेवर उभे होते. त्यानंतर मनोहर जोशींनी सभात्याग केला.

हेही वाचा – मुख्यमंत्री असताना मनोहर जोशी यांना ‘या’ योजनेचा आनंद अन् दुःखही, गडकरींनी सांगितला होता किस्सा

हेही वाचा – ‘‘मोदी सरकारने स्वामिनाथन यांना राष्ट्रपती करण्याची शिवसेनेची सूचना नाकारली होती,” उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट; म्हणाले, “आमचे सरकार आले तर…”

एकूणच ज्या पद्धतीने भाजपने शिवसेनेकडील विरोधी पक्षनेतेपद हिसकावून घेतले. त्यामुळे मनोहर जोशी संतापले होते. त्यांनी बाहेर पडल्यावर सरकारी वाहन न वापरता ऑटोने नागपुरातील आमदार निवास गाठले.