नागपूर : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन काडतूससह एका प्रवाशाला अटक करण्यात आली. सोनेगाव पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. विमानतळावर शुक्रवारी संध्याकाळी नागपूरहून दिल्लीला प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाकडून एक देशी पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली. अनिल श्रीकृष्ण पोराद (३८ वर्षे) असे आरोपी प्रवाशाचे नाव असून तो यवतमाळचा रहिवासी आहे. अरुण हा माजी भाजप पदाधिकारी असल्याचे सांगितले जाते. सीआयएसएफकडून रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. त्यानंतर त्याला सोनेगाव पोलिस ठाण्याच्या हवाली करण्यात आले.
शुक्रवारी संध्याकाळी ६:४५ वाजता इंडिगो एअरलाइन्सच्या नागपूर-दिल्ली फ्लाइट क्रमांक ६ ई २२१३ वरून तो दिल्लीला जाण्याच्या तयारीत होता. त्याने बॅगेत एक देशी पिस्तूल आणि दोन काडतुसे ठेवली होती. सीआयएसएफने केलेल्या यांत्रिक तपासणीदरम्यान त्याच्या बॅगेत शस्त्रे असल्याचे दिसून आले. यानंतर, पथकाने बॅगची झडती घेतली तेव्हा त्यात एक पिस्तूल आणि काडतुसे आढळली. सीआयएसएफच्या जवानांनी याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली आणि आरोपीला आपल्या ताब्यात घेतले. देशी पिस्तूल आणि काडतुसे कुठून आली हे त्याला माहिती नाही, ते कुणी तरी बॅगेत ठेवले असा त्याने अगोदर दावा केला. मात्र, कठोर चौकशी केल्यानंतर त्याने सांगितले की, त्याने हे पिस्तूल दोन महिन्यांपूर्वी खरेदी केले होते.
त्याच्याकडे पिस्तुलाचा परवानाही नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अरुण हा कृषी व्यापारी असून त्याची दालमिल आहे. व्यवसायाच्या संदर्भात एका सरकारी संस्थेच्या दिल्ली कार्यालयात जात होता. रात्री उशिरापर्यंत सीआयएसएफकडून त्याची चौकशी करण्यात आली. आता सोनेगाव पोलिस ठाण्यात त्याची चौकशी होईल.
दरम्यान सायंकाळी दिल्लीकडे जाणाऱ्या विमानातून तो रवाना होणार होता. यावेळी त्याने आतमध्ये प्रवेश करतेवेळी तेथील केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांना त्याच्या बॅगमध्ये काही संशयास्पद वस्तू असल्याचे आढळून आले. त्यांनी तपासणी केली असता बॅगमध्ये एक विदेशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतूस आढळून आले. ही माहिती मिळताच सहआयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ एकचे ऋषीकेश रेड्डी, सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक शेळके आणि सोनेगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन मगर यांच्यासह ताफा घटनास्थळी दाखल झाला. त्यांनी आरोपीला ताब्यात घेत त्याला विचारपूस केली. यावेळी त्याने पिस्तूलचा परवाना असल्याचा दावा केला. मात्र, तो त्याच्या आढळून न आल्याने पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करीत अटक केली.