चंद्रपूर: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तसेच सोमवार ६ ऑक्टोबर रोजी नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर होणार असताना वरोरा नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष एहेतेश्याम अली यांची तब्बल ११ वर्षानंतर काँग्रेस पक्षात घरवापसी झाली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार प्रतिभा धानोरकर यांचे उपस्थितीत नागपूर येथे त्यांनी एका समारंभात अली यांनी काँग्रेस पक्ष प्रवेश केला. त्यांच्या काँग्रेसमध्ये येण्याने पक्षाला बळकटी मिळणार असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.
एहेतेश्याम अली हे स्व.संजय देवतळे यांचे कट्टर समर्थक होते. संजय देवतळे यांना २०१४ मध्ये काँग्रेसने विधानसभा तिकीट नाकारल्या नंतर त्यांनी भाजपात प्रवेश घेऊन भाजपाचे तिकीटवर विधानसभा निवडणूक लढली त्यात ते पराभूत झाले. त्याचवेळी अली हे सुद्धा भाजपावासी झाले. संजय देवतळे यांच्या नेतृत्वात सन २०१६ मध्ये पार पडलेल्या वरोरा नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष म्हणून अली भाजपचे उमेदवार म्हणून विजयी झालेत. नगराध्यक्षांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक लोकोपयोगी कार्य करून आपली प्रतिमा जनमानसात निर्माण केली. संजय देवतळे यांच्या निधनानंतर ते भाजप सोबत एकनिष्ठ होते. मात्र २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपतर्फे विधानसभेची उमेदवारी मागितली परंतु त्यांना नाकारण्यात आली. तेव्हा त्यांनी बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षातर्फे आमदारची निवडणूक लढवली.
त्यात त्यांनी चौथ्या क्रमांकाची मते घेतली. अली यांनी विधानसभेत भाजपा सोबत बंडखोरी केल्यानंतर त्यांनी स्वतःला भाजपापासून दूर केले. अखेर ५ ऑक्टोबरला नागपूर येथील एका कार्यक्रमात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश घेऊन तब्बल ११ वर्षांनी परत काँग्रेसवासी झालेत. त्यांच्या काँग्रेस पक्षप्रवेशाने या भागात काँग्रेस पक्षाला उभारी मिळणार हे मात्र तितकेच खरे. त्यांचे सोबत भाजपाचे भद्रावती तालुका अध्यक्ष तुळशीराम श्रीरामे ,धर्मेंद्र हवेलीकर, शाहीद अली, रवी पवार, अनिल खडसे यांचे सह असंख्य कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतला.