यवतमाळ : वणी बाह्यवळण मार्गावर कार आणि ट्रकच्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. ही घटना आज शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजताच्या वणी घुग्गुस मार्गावरील लालगुडा गावाजवळील ओम नगरीजवळ घडली. या अपघातात रियाझुद्दीन रफिकोद्दीन शेख (५३), मायरा रियाझुद्दीन शेख (१८), झोया रियाझुद्दीन शेख (१३), अलिबा रियाझुद्दीन शेख (११) सर्व रा. भीम नगर वणी, हे चार जण जागीच ठार झाले. तर, इहाना शदिनकोद्दीन शेख (५) ही गंभीर जखमी झाली. तिला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले.

प्राप्त माहितीनुसार, रियाझुद्दीन शेख हे भीमनगर वणी येथील रहिवासी आहे. त्यांचे लाल पुलिया परिसरात गॅरेज आहे. सध्या सुटी असल्याने ते त्यांच्या मुलीला कार शिकवीत होते. आज शुक्रवारी ते त्यांच्या तीन मुली व भावाच्या मुलीला घेऊन घुग्घुस रोडवर स्कोडा ही कार घेऊन गेले होते. त्यांची मुलगी मायरा (१०) ही कार चालवीत होती. दरम्यान लालगुड्याच्या आधी ओम नगरीजवळ डीपीरोडवर टर्न घेताना तिचे कार वरील नियंत्रण सुटले व वाहन दुभाजकाला धडकले. त्यानंतर ते दुसऱ्या बाजूच्या रस्त्यावर गेले. त्यावेळी समोरून येणाऱ्या ट्रकची कारला जोरदार धडक बसली.

अपघातात कारमध्ये बसलेले पाचही व्यक्ती चार गंभीर जखमी झाले होते. जखमींना उपचारासाठी वणी येथे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिघांना मृत घोषीत केले. तर एका व्यक्तीवर उपचार सुरू असताना उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर इहाना हिला गंभीर अवस्थेत चंद्रपूर येथे रेफर केले. मात्र तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अपघात होताच घटनास्थळावरील लोक मदतीसाठी धावून आले. कारला ट्रकची धडक इतकी भीषण होती की, कारचे तुकडे झाले. लोकांनी जखमींना बाहेर काढले. जखमींना वणी तील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. पुढील तपास ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहे. वणी शहरातील खनिज कोळसा वाहतूक करणारे अवजड वाहने नागरिकांसाठी काळ ठरत आहे. या अपघातानंतर वणीतील जड वाहतुकीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.