गडचिरोली: जिल्ह्यातील गडचिरोली, आरमोरी आणि देसाईगंज या तीनही नगरपालिकांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून, १० नोव्हेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच प्रमुख पक्षांमध्ये राजकीय हालचालींना वेग आला असला, तरी या ‘इच्छुकां’च्या भाऊगर्दीचा सर्वाधिक फटका सत्ताधारी भारतीय जनता पक्षालाच बसताना दिसतो आहे. गतवेळी तिन्ही नगरपालिकांमध्ये निर्विवाद वर्चस्व मिळवलेल्या भाजपमध्ये, यंदा उमेदवारीवरून तीव्र गटबाजी उफाळून आली आहे.
नगराध्यक्षपद आणि नगरसेवकपदाच्या प्रत्येक जागेसाठी पक्षात इतके ‘इच्छुक’ तयार झाले आहेत की, उमेदवारांची निवड करताना नेत्यांचा कस लागत आहे. अनेकांनी ‘देव पाण्यात ठेवले’ असून, तिकीट न मिळाल्यास बंडखोरीचा पवित्रा घेतल्याने, रुसवे-फुगवे काढताना आणि मनधरणी करताना नेत्यांची दमछाक होत आहे.
मागील पंचवार्षिक निवडणुकीत, गडचिरोली पालिकेत भाजपने २७ पैकी तब्बल १९ जागा जिंकत एकहाती सत्ता काबी केली होती. देसाईगंजमध्येही २१ पैकी १३ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले होते, तर आरमोरीमध्ये २० पैकी ८ जागा जिंकत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला होता. तिन्ही ठिकाणी नगराध्यक्षपदही भाजपकडेच होते. मात्र, हेच निर्विवाद यश यंदा भाजपसाठी डोकेदुखी ठरत आहे. पक्षाची ताकद वाढल्याने प्रत्येक प्रभागात उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या चौपट झाली आहे. यात विद्यमान नगरसेवकांसह अनेक नवीन चेहरेही असल्याने, कोणाला संधी द्यायची आणि कोणाला डावलायचे, यावरून पक्षातच तीव्र मतभेद आणि गटबाजी निर्माण झाली आहे.
गडचिरोलीत नगराध्यक्षपदावरून पेच
गटबाजीचा सर्वाधिक प्रभाव गडचिरोली नगराध्यक्षपदावरून दिसून येत आहे. हे पद यंदा ‘सर्वसाधारण महिला’ प्रवर्गासाठी राखीव आहे. भाजपकडून यासाठी अनेकजणी इच्छुक असल्या, तरी स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांमध्ये एकाही नावावर एकमत होऊ शकलेले नाही. विविध गटांनी आपापली नावे पुढे रेटल्याने, अखेर हा निर्णय प्रदेश नेत्यांकडे सोपवण्यात आला आहे. यासाठी ११ नोव्हेंबरला मुंबईत विशेष बैठक होणार असून, तेथेच या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब होईल. मात्र, यामुळे स्थानिक नेत्यांमधील मतभेदच चव्हाट्यावर आले आहेत.
आरमोरी-देसाईगंजमध्येही सारखीच स्थिती
केवळ गडचिरोलीच नव्हे, तर आरमोरी आणि देसाईगंजमध्येही गटबाजीचे हे लोण पसरले आहे. आरमोरी (अनुसूचित जाती) आणि देसाईगंज (नागरिकांचा मागास प्रवर्ग – महिला) येथील नगराध्यक्षपदासाठीही पक्षात अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. या दोन्ही पालिकांच्या उमेदवार निवडीत माजी आमदार कृष्णा गजबे आणि ज्येष्ठ नेते अरविंद पोरेड्डीवार यांची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. मात्र, विविध गट आपापल्या नेत्यांमार्फत उमेदवारीसाठी लॉबिंग करत असल्याने, अंतिम यादी जाहीर होईपर्यंत हा संघर्ष थांबण्याची चिन्हे नाहीत.
बंडखोरांना ‘गळाला’ लावण्याची काँग्रेसची रणनीती
एका बाजूला भाजप स्वपक्षीयांमधील या गटबाजीने हैराण असताना, दुसरीकडे काँग्रेस मात्र सावध पवित्रा घेत आहे. काँग्रेसमध्येही इच्छुकांची संख्या कमी नाही. १२ नोव्हेंबरला मुंबईत काँग्रेस नेत्यांची बैठक होऊन उमेदवार निश्चित केले जाणार आहेत.
भाजपची यादी जाहीर झाल्यानंतर, त्यातील नाराज आणि बंडखोरी केलेल्या इच्छुकांना गळाला लावण्याची आणि पक्षात सामावून घेण्याची रणनीती काँग्रेसने आखल्याचे समजते. त्यामुळे, भाजपला केवळ निवडणुकीच्या आखाड्यातच नव्हे, तर त्यापूर्वी स्वपक्षातील ‘बंडखोरी’ थोपवण्याचे दुहेरी आव्हान पेलावे लागणार आहे.
या तिन्ही पालिका मिळून एकूण ६८ नगरसेवक निवडायचे असून, यात ४३,५१५ मतदार (गडचिरोली), २२,९९९ मतदार (आरमोरी) आणि २६,३५२ मतदार (देसाईगंज) आपला हक्क बजावणार आहेत. मात्र, मतदारांपर्यंत पोहोचण्याआधी, पक्षाला ‘घरातील’ नाराजीच शमवावी लागत असल्याने, कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडते आणि कोणाचा पत्ता कट होतो, यावरच बंडखोरीचे भवितव्य अवलंबून आहे.
