गडचिरोली : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे मंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे. त्यापार्श्वभूमीवर गडचिरोलीत अजित पवार गटाचे विद्यमान मंत्री धर्मरावबाबा आत्राम आणि भाजपचे नवनिर्वाचित आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांची नावे मंत्रीपदासाठी चर्चेत असल्याची माहिती सूत्रांनी दिल्याने गडचिरोलीत याबद्दल उत्सुकता दिसून येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने एकतर्फी विजय मिळवीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव केला. परंतु गडचिरोलीत एका जागेवर भाजपची पीछेहाट झाली. गेल्या एक दशकापासून भाजप आणि महायुतीचे जिल्ह्यावर वर्चस्व होते. लोकसभा आणि विधानसभेत भाजपला म्हणावे तसे यश मिळवता आले नाही. त्यामुळे पुढे होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता भाजप नेतृत्वाकडून गडचिरोलीला मंत्रीपद देण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवनिर्वाचित आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांना राज्यमंत्री पद मिळू शकते. दुसरीकडे महायुतीतील मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते तसेच अहेरी विधानसभेचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांना देखील कॅबिनेट मंत्रीपदी कायम ठेवण्याचे जवळपास निश्चित आहे. येत्या काही वर्षात गडचिरोलीत लोहखनिजावर आधारित मोठे उद्योग उभे राहणार आहे. त्यासाठी अनेक कंपन्यांकडून मोठी गुंतवणूक देखील आधीच जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्याला मंत्रिपद देणे गजरजेचे झाले आहे. या पार्श्वभूमीवर आत्राम यांचे मंत्रीपद निश्चित असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे जिल्ह्याला किती मंत्रीपद मिळणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा – ‘हैद्राबादचे पार्सल परत पाठवा’, खरेच आता तसे घडणार का ?

हेही वाचा – चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभेत भाजपाचे मताधिक्य वाढले; चार उमेदवारांना लाखांवर मते

भाजपमधील मंत्रिपदाचा दुष्काळ कधी संपणार?

एकेकाळी जिल्ह्यावर असलेले काँग्रेसचे वर्चस्व संपवून भाजपने २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत तिन्ही जागेवर जोरदार मुसंडी मारली होती. परंतु भाजप नेतृत्वाने आरमोरी आणि गडचिरोलीला वगळून अहेरीचे तत्कालीन आमदार अम्ब्रीश आत्राम यांना राज्यमंत्री पद दिले. परंतु २०१९ च्या निवडणुकीपूर्वी निष्क्रियतेचा ठपका ठेऊन त्यांना मंत्रीपदावरून हटविले. त्या निवडणुकीत आत्राम यांचा पराभव देखील झाला. तेव्हादेखील गडचिरोली, आरमोरीला मंत्रीपद मिळाले नाही. यंदा राज्यात भाजप सर्वाधिक यशस्वी पक्ष ठरला असला तरी गडचिरोलीत त्यांना संमिश्र यश मिळाले. त्यामुळे यावेळी तरी गडचिरोलीला मंत्रीपद द्यावे अशी इच्छा पक्षातील नेत्यांनी व्यक्त केली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gadchiroli district minister discussion dharmarao baba atram and milind narote ssp 89 ssb