गडचिरोली : महाराष्ट्राच्या सीमेपासून दहा किमी अंतरावर असलेल्या छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यातील अबुजमाडच्या जंगलात २२ सप्टेंबरला झालेल्या चकमकीत कादरी सत्यनारायण उर्फ कोसा (६७) आणि कट्टा रामचंद्र रेड्डी उर्फ विकल्प उर्फ राजू दादा (६१) या नक्षलवाद्यांच्या दोन केंद्रीय समिती सदस्यांना ठार करण्यात आल्याचा दावा सुरक्षा दलाने केला होता.

मात्र, ही चकमक बनावट असून पोलिसांनी दोघांना अटक केली होती. दहा दिवस छळ करून त्यांना ठार मारले, असा आरोप नक्षलवाद्यांनी पत्रकातून केला आहे. नक्षलवाद्यांच्या दंडकारण्य झोनल समितीने २३ सप्टेंबरला जारी केलेले पत्रक गुरुवारी समोर आले. त्यात चळवळीतील मोठ्या नेत्यांच्या मृत्युमुळे माेठे नुकसान होत असल्याची कबुलीही देण्यात आली.

कोसा हा नक्षल चळवळीतील अत्यंत महत्त्वाचा नेता होता. केंद्रीय समितीत त्याचा मोठा प्रभाव होता. विकल्पकडे प्रवक्तेपदासह महत्त्वाची जबाबदारी होती. कारवाईनंतर घटनास्थळावरून दोघांच्या मृतदेहासह मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा, स्फोटके, साहित्य आणि नक्षलवादी प्रचारसाहित्य जप्त करण्यात आले होते.

कोसा व राजू दादा यांना रायपूर किंवा इतर ठिकाणहून पोलिसांनी ११ ते २० सप्टेंबरदरम्यान अटक केली असावी. त्यानंतर नक्षलवादी चळवळीबद्दल गोपनिय माहिती जाणून घेण्यासाठी त्यांचा खूप छळ केला असावा, अशी शक्यता या दोन पानी पत्रकात वर्तवली आहे. त्यानंतर २२ सप्टेंबरला या भागात नक्षलवादविरोधी अभियान राबवून बनावट चकमकीत त्यांना ठार केले असावे, असा आरोपही नक्षलवाद्यांनी केला आहे. दरम्यान, सुरक्षा दलाने नक्षलवाद्यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

प्रत्युत्तर देण्याची भाषा

नक्षलवाद्यांनी या पत्रकातून जहाल नेत्यांच्या मृत्यूबद्दल सहवेदना व्यक्त करत चळवळीचे नुकसान होत असल्याची कबुली दिली. मृत माओवाद्यांचे अपूर्ण कार्य पूर्ण करू, अशा शब्दांत सुरक्षा दलावर सूड उगविण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा सतर्क असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

वर्षभरात मोठ्या नेत्यांसह २५० नक्षलवादी ठार

सुरक्षा दलांनी वर्षभरात मोठ्या नेत्यांसह २५० नक्षलवाद्यांना ठार केले आहे. पोलिसांच्या कारवायांमुळे कोंडीत सापडलेल्या मोठ्या नेत्यांनी शस्त्र टाकून आत्मसमर्पण केले. याच महिन्यात छत्तीसगडमधील गरियाबंद येथे झालेल्या चकमकीत केंद्रीय समिती सदस्य मनोज ठार झाला होता. केंद्रीय समिती सदस्य तथा सर्वोच्च महिला नक्षल नेता सुजाता हिने तेलंगणात आत्मसमर्पण केले. त्यानंतर केंद्रीय समिती सदस्य सहादेव सोरेन झारखंडमध्ये ठार झाला. सोमवारी आणखी दोन केंद्रीय समिती सदस्य ठार झाल्याने नक्षल चळवळीला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.