नागपूर : भाजपने कामठी विधानसभा मतदारसंघातून मतचोरीचे ‘मॉडेल’सुरू केले. भाजपचे तत्कालिन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या मतदारसंघात पहिला प्रयोग केला आणि त्यानंतर राज्यातील विविध मतदारसंघात तो राबवण्यात आला, असा आरोप बुधवारी काँग्रेसने केला होता. त्यावर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गज्जू यादव यांनी काँग्रेसने केलेले आरोप फेटाळून लावले कामठी विधानसभा मतदारसंघात चार महिन्यांत ३५ हजार मतदार वाढले आणि मत चोरी केली, हा काँग्रेसचा आरोप चुकीचा आहे. प्रत्यक्षात लोकसभेच्या निवडणुकीनंतर ७ महिने झालेल्या नोंदणीत ३१ हजार ८५९ मतदार वाढले, असा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष उदयसिंग उर्फ गज्जू यादव यांचा दावा आहे.

कामठी शहरातून मत चोरीचा आरोप काँग्रेसने केला. मात्र, तेथेच काँग्रेसचे उमेदवार १६ हजार ४६० मतांनी आघाडीवर होते. प्रत्येक बूथवर भाजपचे उमेदवार पिछाडीवर होते. कामठी शहरातील ८९ बूथवर काँग्रेसचे सुरेश भोयर यांना मताधिक्य असून, त्यांना ३२ हजार ६९१ मते मिळाली. भाजप नेते महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना १६ हजार २३१ मते मिळाली. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार श्यामकुमार बर्वे यांना कामठी विधानसभा क्षेत्रामध्ये १ लाख ३६ हजार ४२ मतदान मिळाले. काँग्रेस नेते दूषित मानसिकतेतून मत चोरीचा आरोप करीत आहेत, अशी टीकाही यादव यांनी केली आहे.

अखिल भारतीय काँग्रेस समितीने देशभर ‘वोट चोर, गद्दी छोड’, मेळाव्याचे आयोजन कामठी येथे बुधवारी केले होते. या मेळाव्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील, काँग्रेस कार्य समितीच्या सदस्य यशोमती ठाकूर, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव कुणाल चौधरी, माजी मंत्री सुनिल केदार, नसीम खान, खासदार श्यामकुमार बर्वे, प्रतिभा धानोरकर, प्रशांत पडोले, नामदेव किरसान, बळवंत वानखेडे, आमदार अभिजित वंजारी, नागपूर ग्रामीण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे, सचिन सावंत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व हजारो लोक उपस्थित होते.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ मेळाव्यात म्हणाले, कामठीतील मेळावा हा सरकारला इशारा असून लोकशाहीला हात लावाल तर खबरदार. नागपूरमधून ७५ वर्षाच्या नेत्यांना खूर्ची खाली करण्याचे आदेश निघाले आहेत, त्यामुळे मोदींच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि तो दिवस दूर नाही की देशात मध्यावधी निवडणुका होतील आणि शिव, शाहु, फुले व आंबेडकरांच्या विचाराचे नवे सरकार येईल. ‘वोट चोर, गद्दी छोड’ हा काँग्रेसचा नारा असून आता गप्प बसून चालणार नाही. या लढाईत सर्वांनी सहभागी झाले पाहिजे, असे सपकाळ म्हणाले.