गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण भागात फोफावलेली अंधश्रद्धा काही केल्या कमी होताना दिसत नाही. जादूटोणा प्रकारावरून अनेक ठिकाणी शिवीगाळ, मारहाण, खून अशा घटना घडत आहेत. पोलिससुद्धा अशा प्रकरणांत गुन्हा दाखल करून मोकळे होतात, मात्र जादूटोणा कायद्यान्वये गुन्हा दाखल करून आरोपींना दंड देण्यास धजावत नाही. तिरोडा तालुक्यातील ग्राम चिरेखनी येथे २७ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता जादूटोण्याच्या संशयावरून एका वृध्द दाम्पत्याला मारहाण करण्याची घटना घडली होती . त्याची पोलीस तक्रार सात डिसेंबरला करण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चिरेखनी येथे नामदेव मार्कड पारधी (६५) हे पत्नी सुभद्रा व कारणबाई राहतात.दीड महिन्यांपूर्वी म्हणजे २७ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता आरोपी मुन्ना उर्फ संतोष गुलाब रहांगडाले (४५) व सुन्ना उर्फ प्रमोद रहांगडाले (४२, रा.चिरेखनी) हे नामदेव पारधी यांच्या घरासमोर आले व तुझ्यामुळे माझा मुलगा मरण पावला, असा आरोप केला. या मुद्यावरून वाद झाला व नामदेव पारधी यांना मारहाण करण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. नामदेव पारधी यांनी शनिवारी ७ डिसेंबर रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी तिरोडा, जिल्हाधिकारी गोंदिया व गोंदिया पोलिस अधीक्षकांकडे तक्रार करून पोलीस या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने करीत नाही, असा आरोप केला. जादूटोणा कायद्यान्वये गुन्हा दाखल केलेला नाही. आरोपींवर योग्य कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली .

हेही वाचा…‘ऑपरेशन नन्हे फरिश्‍ते’ ; रेल्‍वे सुरक्षा दलाने अकराशे मुलांची केली सुटका

फिर्यादीच्या पत्नीचा हात मोडला

नामदेव पारधी यांच्या तक्रारीनुसारमुन्ना, सुन्ना व पिंटू रहांगडाले यांनी केलेल्या मारहाणीत त्यांच्या पत्नीचा हात मोडला.रात्री २ वाजता पोलिस ठाणे गाठून सर्व हकिकत पोलिसांना सांगितली, पोलिसांनी त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात नेले व उपचारानंतर चिरेखनी येथे सोडून दिले. दुसऱ्या दिवशी पत्नी सुभद्रा यांना तिरोडा पोलिस ठाण्यात नेले. त्यानंतर त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालय व नंतर गोंदियात केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात औषधोपचार केले. त्यात हाड मोडल्याचे निदान झाल्याने पत्नीवर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

“या प्रकरणात पोलिसांनी जादूटोणा प्रतिबंधक कायद्याखाली आरोपीवर कारवाई करावी, अशा घटना टाळण्यासाठी पोलिसांनी खबरदारी घ्यावी ” प्रकाश धोटे, जिल्हा संघटक, अंनिस, गोंदिया

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gondia elderly couple beaten in chirekhni tiroda on black magic suspicion sar 75 sud 02