नागपूर : देशभरात गाजलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील आकस्मिक केसगळतीच्या साथीवर बुरशी प्रतिबंधक औषधांची मात्रा लागू पडली आहे. टक्कल पडलेल्यांना नवीन केस येत आहेत. परंतु, विविध तपासणी अहवालात मात्र अद्यापही आजाराचे निदान होऊ शकले नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या बुलढाणा जिल्ह्यातील १२ हून अधिक गावातील २२२ रुग्णांचे अचानक केस गळायला लागले. ही बातमी देशभर गाजल्यावर भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर), दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, नागपुरातील क्षेत्रीय आयुर्वेद अनुसंधान संस्था, मुंबईतील होमिओपॅथी संशोधन संस्था, चेन्नईतील सिद्ध सायंस, मुंबईतील युनानी संस्थेतील तज्ज्ञांच्या चमूने संबंधित गावात ॲलोपॅथीसोबतच इतरही पॅथीची औषधे दिली.

या क्रमात नागपुरातील क्षेत्रीय आयुर्वेद अनुसंधान संस्थेने सुमारे पाच गावांतील रुग्णांना आयुर्वेदाची मात्रा दिली. यातील बुरशी प्रतिबंधक औषधांचा प्रयोग यशस्वी झाला आहे. त्यामुळे टक्कल पडलेल्या सुमारे १०० नागरिकांच्या डोक्यावर पुन्हा नवीन केस येऊ लागले. अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील प्रयोगशाळेत गळालेले केस व बायोप्सीचा अहवालही पुढे आला. त्यात मात्र या रुग्णांच्या केसात बुरशीचे जंतूच आढळले नाहीत. आयसीएमआरकडून मात्र सगळे अहवाल मात्र आलेले नाहीत. त्यामुळे आताही केसगळती नेमकी कशामुळे, हे स्पष्ट झालेले नाही.

गळालेले केस, त्वचा, त्वचेचे नमुने अकोला येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत तपासल्यावर त्यात बुरशीचे जंतू आढळले नाहीत. या आजाराच्या कारणाचा शोध सुरू आहे. रुग्णांना बुरशी प्रतिबंधक औषध दिल्यावर केस येताना दिसत आहेत. – प्रा. डॉ. रचना लौल, त्वचारोग विभागप्रमुख, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला.

केसगळती झालेल्यांना आयुर्वेदातील बुरशी प्रतिबंधक औषध दिल्याचा लाभ दिसत आहे. लवकरच या आजाराबाबत आणखी अभ्यास केला जाईल. त्यासाठी पून्हा आमची चमू बुलढाण्यातील संबंधित गावात लवकरच जाणार आहे. – मिलिंद सूर्यवंशी, सहाय्यक संचालक, क्षेत्रीय आयुर्वेद अनुसंधान संस्थान, नागपूर.

नागपूर एम्समधील तज्ज्ञांची चमू सोमवारी (२७ जानेवारी) संबंधित गावात गेली. रुग्णांचे नमुने घेतले व नवीन २२ रुग्णांना औषध दिले जात आहे. या चमूकडूनही केसगळतीचे कारण शोधण्याचे प्रयत्न केले जाणार आहे. अद्याप केसगळती आजाराबाबत ठोस माहिती पुढे आली नाही. परंतु आयसीएमआर आणि एम्सच्या अहवालातून काहीतरी ठोस पुढे येण्याची आशा आहे. – डॉ. प्रशांत तांगडे, जिल्हा आरोग्य अधिकारी, बुलढाणा.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hair again for those who are bald in buldhana allopathy ayurveda homeopathy treatment mnb 82 ssb