गडचिरोली : जिल्ह्यात काल संध्याकाळपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून, अनेक भागांत पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. गडचिरोली शहरात रात्रभरात तब्बल १७२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. परिणामी, नदी-नाल्यांची पातळी झपाट्याने वाढली असून, अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. भामरागड तालुक्यात १९ वर्षीय तरुण नाला ओलांडताना वाहून गेला.
पावसामुळे जिल्ह्यातील एकूण ९ मुख्य मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. यामध्ये भामरागड, अहेरी, चामोर्शी, मुलचेरा, कुरखेडा आणि देसाईगंज तालुक्यांतील रस्त्यांचा समावेश आहे. पर्लकोटा, वटरा, पोहार, गोमणी आदी नाल्यांमध्ये पाणी पातळी वाढल्याने रस्ते जलमय झाले आहेत.
जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. नद्या व नाल्यांच्या काठावर राहणाऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शाळा आणि महाविद्यालयांना देखील तात्पुरती सुट्टी जाहीर केली जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
आपत्ती व्यवस्थापन पथक, महसूल व पोलीस प्रशासनाकडून परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात असून, मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. पूरस्थितीमुळे शेतीवरील संकट अधिक गडद झाले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास आणखी रस्ते बंद होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
१९ वर्षीय तरुण गेला वाहून
भामरागड तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. दरम्यान काल १८ ऑगस्ट रोजी कोडपे गावातील १९ वर्षीय लालचंद कपिलसाय लकडा दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास खंडी नाला ओलांडताना पुरामध्ये वाहून गेला आहे. प्रशासनातर्फे तरुणाचा शोध घेणे सुरू असल्याची माहिती भामरागडचे तहसीलदार किशोर बागडे यांनी सांगितले आहे.
वाहतुकीस बंद असलेले प्रमुख मार्ग
हेमलकसा-भामरागड राष्ट्रीय महामार्ग १३० डी (पर्लकोटा नदी), अहेरी-वटरा रस्ता, राज्य महामार्ग ३७० (वटरा नाला), तळोधी-आमगाव-महाल-विसापूर राज्य महामार्ग ३८१ (पोहार नदी), आष्टी-कोपरअली रस्ता, राज्य महामार्ग ३७८, मुलचेरा-गोमणी रस्ता, राज्य महामार्ग ३७० (गोमणी नाला), चौडमपल्ली-चपराळा रस्ता, प्रजिमा ५३ (स्थानिक नाला), काढोली-उराडी रस्ता, प्रजिमा ७ (स्थानिक नाला) शंकरपूर-डोंगरगाव रस्ता, प्रजिमा १, कोकडी-तुलशी रस्ता, प्रजिमा ४९ हे ९ मार्ग बंद आहेत.