अकोला : अकोला व वाशिम जिल्ह्यात दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे शेत जमीन खरडून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अनेक घरांची पडझड झाली. रस्ते व पुलांचे देखील नुकसान झाले. पावसाचा मोठा फटका दोन्ही जिल्ह्यांना बसला आहे.
अकोला जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्यपूर्ण पावसाने हजेरी लावली. विविध भागामध्ये गुरुवार व शुक्रवार दोन दिवस अतिवृष्टी झाली. गुरुवारी पातूर तालुक्यात, तर शुक्रवारी बाळापूर, पातूर व बार्शीटाकळी तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. जिल्ह्यात सरासरी ३८ मि.मी. पाऊस पडला. पातूर ६८.८०, बाळापूर ६७.८० आणि बार्शीटाकळी तालुक्यामध्ये ७३.५० मि.मी. पाऊस झाला. जिल्ह्यातील ५२ मंडळांपैकी १३ मंडळांमध्ये मुसळधार पाऊस कोसळून अतिवृष्टीची नोंद झाली आहे. या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
पातूर तालुक्यातील ११, तर बाळापूर तालुक्यातील ७४ घरांची पडझड झाली आहे. पातूर तालुक्याच्या ३२ गावातील ८८७ हेक्टर शेत जमिनीवरील तूर, सोयाबीन, कपाशी व इतर पिकांचे नुकसान झाले. ३५१ हेक्टर शेत जमीन खरडून गेली आहे. अतिवृष्टी झालेल्या झरंडी, वसाली, पिंपळखुटा व इतर गावातील रस्ते व पुलांचे देखील नुकसान झाले. विश्वमित्रा नदीचे पाणी झरंडी गावात शिरल्याने वीज पुरवठा करण्यासाठी उभारलेले रोहित्र पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. शेतातील वीज खांबही पडल्याने परिसरातील संपूर्ण वीज पुरवठा खंडित झाला आहे.
वाशीम जिल्ह्यात १५ हजार ३०३ हेक्टरचे मोठे नुकसान
अतिवृष्टीमुळे वाशीम जिल्ह्यात देखील मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यामध्ये ८९.५ मि. मी. सरासरी पाऊस झाला. ३८ मंडळांमध्ये ६५ मि.मी. पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. एका घराची पडझड झाली आहे. वाशीम जिल्ह्याच्या ७८ गावातील १६ हजार ०६० शेतकऱ्यांच्या १५ हजार ३०३ हेक्टर शेत जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले. तूर, सोयाबीन, संत्रा आदी पिके व फळबागांना पावसाचा फटका बसला आहे. रिसोड तालुक्यात पावसामुळे सर्वाधिक नुकसान झाले.
तालुक्यातील ११ हजार ९६४ हेक्टर जमिनीवरील पिके उद्ध्वस्त झाली. वाशीम तालुक्यातील ७८६, तर मालेगाव तालुक्यातील दोन हजार ५५२ हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले. रिसोड तालुक्यातील ९२१ शेतकऱ्यांची एक हजार ०८० हेक्टर जमीन खरडून गेली. जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या सात विहिरी देखील खचून मोठे नुकसान झाले.