अकोला : जिल्ह्यात २२ मे ते २५ मे या चार दिवसांत शून्य सावली दिवस अनुभवता येणार आहे. २३ मे रोजी सूर्य व चंद्र बरोबर विरूद्ध दिशेने राहणार असून मधात पृथ्वी येणार असल्याची माहिती खगोल निरीक्षक प्रभाकर दोड यांनी दिली. सूर्याचा उत्तरायण आणि दक्षिणायन असा भासमान मार्ग पृथ्वीच्या २३.५०° दक्षिण आणि उत्तरेकडे असतो. कर्कवृत्त आणि मकरवृत्त या दरम्यान असणाऱ्या सर्व भूभागावर सूर्य वर्षातून दोनदा दुपारी डोक्यावर येतो आणि दोनदा शुन्य सावली दिवस येतात. उत्तरायण आणि दक्षिणायन होताना ही स्थिती राहते. सूर्य दररोज ०.५०° सरकतो. सूर्य क्रांती पृथ्वीवरील स्थळाशी समान कोन करते, तेव्हा सूर्य माध्यान्हाचे वेळी नेमका डोक्यावर आल्याने आपली सावली काही क्षणासाठी नाहिशी होते. उन्हाळ्यातील त्या शून्य सावली दिवसाला अधिक महत्त्व आहे, असे खगोल निरीक्षक प्रभाकर दोड यांनी सांगितले.

अकोला जिल्ह्यात २२ मे रोजी शून्य सावली दिवसाला सुरुवात होईल. पातूर, वाडेगाव, धाबा, महान, पिंजर या दक्षिण परिसरातून २२ रोजी शून्य सावली दिवस अनुभवता येईल. २३ मे रोजी अकोला, मूर्तिजापूर, बाळापूर भागात दुपारी १२ वाजून १८ मि. ३० से. ला सावली नाहिशी होईल. २४ मे रोजी पूर्णा नदीच्या उत्तर भागात दहिहांडा, केळीवेळी, चोहोट्टा, अंदूरा या परिसरात सावली काही क्षणांसाठी नाहिशी होईल. २५ मे रोजी अकोट, सावरा, अडगाव, हिवरखेड या भागात शून्य सावली दिवसाचा आनंद घेता येणार आहे, असे दोड म्हणाले.

हेही वाचा : आता कायदेशीर मार्गाने कुलगुरू डॉ. चौधरींच्या निलंबनाचा डाव? चौकशी अहवालावर उत्तर सादर करण्याचे आदेश

अकोला जिल्ह्यात अनेकवेळा तापमानाचे नवनवे विक्रम रचले जातात. देशातील सर्वाेच्च तापमानाची नोंद सुद्धा जिल्ह्यात झाली आहे. अकोला शहर कर्कवृत्तावर असल्याचे समजले जाते. मात्र, अकोला शहर कर्कवृत्तापासून सुमारे ३०० कि.मी दूर अंतरावर आहे. २३ मे रोजी पौर्णिमा असल्याने सूर्य आणि चंद्र यांच्या मध्ये पृथ्वी येणार आहे. यावेळी सूर्य डोक्यावर, तर चंद्र बरोबर पायाखाली अर्थात पृथ्वीच्या दूसऱ्या बाजूला असेल. संध्याकाळी सूर्य पश्चिमेस व पूर्वेस पूर्णचंद्र बघता येईल, असे प्रभाकर दोड यांनी सांगितले.

हेही वाचा : आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच विदर्भाच्या खेळाडूला कर्णधारपद….

मराठी महिन्यांची देखील अनुभूती

मराठी महिन्यांची नावे प्रत्येक पौर्णिमेला चंद्र ज्या नक्षत्रात असेल त्यावरून ठेवली आहेत, याची अनुभूती घेता येईल. या वैशाख पौर्णिमेला चंद्र विशाखा नक्षत्रात पाहता येईल. पुढील ज्येष्ठ महिन्यात ज्येष्ठा नक्षत्राजवळ असेल, असे दोड म्हणाले.