नागपूर : इंडियन प्रिमियर लीगचा (आयपीएल) यंदा १७ वा हंगाम सुरू आहे.स्पर्धा अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. अशात आयपीएलच्या आजवरच्या इतिहासात विदर्भातील खेळाडूला पहिल्यांदाच कर्णधारपद भूषविण्याचा मान मिळाला आहे. विदर्भातील फलंंदाज आणि यष्टीरक्षक जितेश शर्मा याला पंजाब किंग्स इलेवन संघाने रविवारच्या सामन्यासाठी कर्णधारपदाची जबाबदारी सोपविली. पंजाब संघाचा यंदाच्या हंगामातील अंतिम सामना सनरायजर्स हैदराबाद या संघाविरोधात झाला.
जितेशने इंग्लंडचा खेळाडू सॅम करण याच्याकडून कर्णधारपदाची जबाबदारी घेतली. सॅम करणची पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यासाठी इंग्लंड संघात निवड झाल्याने तो मायदेशी परतला आहे. त्यामुळे जितेश शर्माकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्याचा निर्णय संघ व्यवस्थापनाने घेतला. आतापर्यंत विदर्भाच्या संघातील अनेक खेळाडूंनी आयपीएलमधील विविध संघाकडून सामने खेळले आहेत. मात्र कर्णधारपदाची जबाबदारी मिळविणारा जितेश शर्मा हा पहिलाच खेळाडू आहे. आयपीएलमध्ये विदर्भाच्या संघातून आतापर्यंत उमेश यादव, फैज फजल,श्रीकांत वाघ, अमित पौनीकर, अथर्व तायडे, यश ठाकूर, शुभम दुबे आणि दर्शन नालकंडे यांनी आयपीएल स्पर्धेत भाग घेतला आहे. जितेशने २०२२ मध्ये आयपीएलमध्ये पहिला सामना खेळला होता. त्याने आतापर्यंत ३९ आयपीएलचे सामने खेळले आहेत. यंदाच्या हंगामात १३ सामन्यामध्ये १२२ च्या स्ट्राईक रेटसह जितेशने १५५ धावा काढल्या आहेत. आयपीएलचा मागचा हंगाम जितेशसाठी अधिक चांगला राहिला होता. त्याने मागील हंगामात १५६ च्या स्ट्राईक रेटसह १४ सामन्यात ३०९ धावा काढल्या होत्या. पंजाबचा संघ सध्याच्या स्पर्धेतून बाहेर झाला आहे. अंकतालिकेत पंजाब हा नवव्या स्थानावर आहे. पंजाबच्या संघाने या हंगामात १३ पैकी ५ सामने जिंकले आहेत.
हेही वाचा >>>रविवार ठरला घातवार; अकोल्यात वेगवेगळ्या अपघातात पाच जणांचा मृत्यू, पाच जखमी
कोण आहे जितेश शर्मा?
भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू जितेश शर्मा हा उजव्या हाताचा यष्टीरक्षक फलंदाज आहे. तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये विदर्भ क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करतो. जानेवारी २०२३ मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत प्रथमच त्याचा भारतीय क्रिकेट संघात समावेश करण्यात आला. जितेश शर्मा चा जन्म २२ नोव्हेंबर १९९३ रोजी अमरावती, महाराष्ट्र येथील एका कुटुंबात झाला. त्याचे वडील मोहन शर्मा एका खाजगी कंपनीत काम करतात आणि आई आशिम शर्मा गृहिणी आहेत. जितेश शर्माला एक मोठा भाऊ असून त्याचे नाव कर्णेश शर्मा आहे. त्याला लहानपणापासूनच क्रिकेट खेळण्याची आवड होती आणि त्याने लहान वयातच व्यावसायिक क्रिकेट खेळायला सुरुवात केली.