नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांचे निलंबन रद्द केले. त्यानंतर डॉ. चौधरी यांनी ११ एप्रिलला पुन्हा पदभार स्वीकारला. परंतु, यानंतर लगेच उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे यांच्या समितीकडून चौकशी सुरू करण्यात आली. आता या समितीने आपला अहवाल शासनाला सादर केला असून यावर कुलगुरूंना उत्तर सादर करण्याचा आदेश ८ मे रोजी देण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे आता कायदेशीर मार्गाने कुलगुरूंच्या निलंबनाचा डाव रचला जात असल्याची चर्चा आहे.

याआधी चौधरी यांच्या विरोधातील तक्रारींच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या उच्च तंत्रशिक्षण विभागाचे उपसचिव अजित बाविस्कर यांच्या समितीने त्यांना दोषी ठरवले होते. परीक्षेच्या कामात महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादितची (एमकेसीएल) निवड आणि विनानिविदा बांधकामांचे कंत्राट देण्यात आल्याचे निष्कर्ष समितीने सादर केलेल्या अहवालात नोंदवण्यात आले होते. यासोबतच विद्यापीठाच्या वतीने विविध विकास कामे करण्यात आली. हे करताना कंत्राट न काढता एकाच व्यक्तिला कामे देण्यात आल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधिक्षक अभियंता यांनी आपल्या अहवालात सदरहू कामे निविदा कार्यवाही न करता केली असल्याचे प्रथम दर्शनी निष्पन्न होत असल्याचा शेरा दिला.

हेही वाचा : आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच विदर्भाच्या खेळाडूला कर्णधारपद….

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या तक्रारींवरून राज्यपालांनी चौधरींना राजीनामा देण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यानंतरही चौधरींनी राजीनामा दिला नाही. त्यामुळे राज्यपालांनी त्यांना निलंबित केले. विशेष म्हणजे, कुलगुरू निलंबित असताना पतोडिया ॲण्ड असोसिएशन या खासगी कंपनीकडून विद्यापीठातील संदिग्ध नस्तींचे अंकेक्षण करण्यात आले होते. तो अहवालही विभागाकडे आहे. मात्र, डॉ. चौधरींनी निलंबनाच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली. यावर नागपूर खंडपीठाने निलंबनाला स्थगिती दिली. चौधरी यांनी ११ एप्रिलला पुन्हा पदभार स्वीकारला. त्यानंतर काहीच दिवसात कुलगुरूंच्या चौकशीसाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे यांची समिती नियुक्त करण्यात आली. या समितीने विद्यापीठामध्ये विविध प्रकरणात चौकशी करीत आपला अहवाल सादर केला. ८ तारखेला कुलगुरूंना पत्र पाठवून पंधरा दिवसात उत्तर सादर करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आहे. यासंदर्भात विचारणा करण्यासाठी कुलगुरूंसह विद्यापीठातील अन्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.