अमरावती : खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना वाट्टेल ते बोलण्‍याची सवय आहे. जे होणार आहे, तेच आम्‍ही बोलतो. अमरावती लोकसभा मतदार संघातून कुठल्‍याही परिस्थितीत आपण निवडणूक लढणार असून एकवेळ राजकारण सोडू, पण नवनीत राणांचा प्रचार करणार नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्‍या शिंदे गटाचे नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी येथे प्रसार माध्‍यमांशी बोलताना दिली. आनंदराव अडसूळ हे निवडणुकीला सामोरे जाणार नसून वडीलकीच्‍या नात्‍याने ते नवनीत राणा यांचा प्रचार करतील, असे वक्‍तव्‍य रवी राणा यांनी अलीकडेच केले होते. त्‍यावर आनंदराव अडसूळ यांनी आश्चर्य व्‍यक्‍त करीत राणांचा दावा खोडून काढला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अडसूळ म्‍हणाले, गेल्या ८ निवडणुकांपासून युतीत अमरावती लोकसभा मतदार संघ शिवसेनेकडेच राहिला आहे. भाजप-सेनेची युती आजही कायम आहे. अमरावती लोकसभेची जागा भाजपची कधीच नव्हती, ती जागा आमचीच आहे. खरी शिवसेना-शिवसेनेचे नाव-पक्ष चिन्ह सर्व काही आमच्याकडेच आहे. त्यामुळे आम्ही आमचा दावा सोडणार नाही. एकवेळ राजकारण सोडू, पण नवनीत राणांचा प्रचार करणार नाही. किंबहुना तशी वेळच येणार नसल्याचा दावाही यावेळी आनंदराव अडसूळ यांनी केला. राणा दाम्‍पत्‍याला काहीही बोलण्‍याची सवय आहे. हे सर्व लोक जाणतात. त्‍यांच्‍या प्रत्‍येक वक्‍तव्‍यावर काय प्रतिक्रिया देणार, असा सवाल करीत कपड्याच्‍या आत सगळे नागडे असतात, असा टोला अडसूळ यांनी लगावला.

हेही वाचा : एमपीएससीतर्फे नवीन पदभरती जाहीर; या पदांसाठी करता येणार अर्ज

नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्र प्रकरणी सर्वोच्‍च न्‍यायालयात दोन्ही पक्षांचा युक्तिवाद आटोपला आहे आणि न्‍यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. लवकरच निर्णय अपेक्षित असून आमच्‍या बाजूने निकाल लागणार आहे. या आधी मुंबई उच्‍च न्‍यायालयाने दिलेल्या १०८ पाणी निकालपत्रात राणांचे सर्व ७ दस्तावेज खोटे असल्‍याचे सिद्ध झाले. सर्वोच्‍च न्‍यायालयातही या बाबी समोर आल्‍या. काय खरे-काय खोटे हे न्यायालयापुढे सर्व पुराव्यानिशी मांडण्यात आले आहे, असे अडसूळ म्‍हणाले.

हेही वाचा : येत्या २४ तासांत राज्यासह देशभरात अवकाळी पावसाची हजेरी

मित्र पक्षांचाही राणांना विरोध- अभिजीत अडसूळ

लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी महायुतीतर्फे प्रत्येक जिल्ह्यात मेळावा झाला. अमरावतीच्या मेळाव्याला प्रहार जनशक्‍ती पक्षाचे आमदार बच्चू कडू, राजकुमार हे जाणीवपूर्वक अनुपस्थित होते. याचे कारण म्हणजे त्यांना महायुतीच्‍या उमेदवार म्हणून नवनीत राणा मान्‍य नाहीत. काहीही झाले तरी नवनीत राणा चालणार नाही ही सामूहिक भूमिका भाजप पदाधिकाऱ्यांसह मित्र पक्षांच्या नेत्यांची आहे. केंद्रीय समितीलाही तसे स्पष्ट्च कळविण्यातही आले असल्याचे माजी आमदार अभिजित अडसूळ यांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In amravati anandrao adsul said that he will not promote navneet rana for lok sabha mma 73 css