अमरावती : शेतकरी, दिव्यांगांच्या प्रश्नांवर प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी गेल्या ८ जूनपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. शनिवारी आदोलनाच्या सातव्या दिवशी त्यांची प्रकृती चांगलीच खालावली आहे. बच्चू कडू यांना तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (आयसीयू) दाखल करण्याची व्यवस्था करावी, असे तिवसा येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिवराज माने यांनी तहसीलदारांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
गुरूकूंज मोझरी येथे बच्चू कडू आणि इतर आंदोलकांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. उपोषणकर्त्यांची वैद्यकीय तपासणी ही तिवसा येथील उपजिल्हा रुग्णालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालयातील आरोग्य पथकामार्फत केली जात आहे. बच्चू कडू यांनी इतर उपोषण कर्त्यांना वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करणे आवश्यक असल्याचे वेळोवेळी निदर्शनास आणून देण्यात आले आहे. तथापि, बच्चू कडू यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत जात आहे.
डॉ. रवि भूषण यांनी बच्चू कडू यांच्या वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना तत्काळ आयसीयूमध्ये दाखल करण्याची आवश्यकता असल्याचे आणि औषधोपचार घेण्याविषयी सुचवले आहे. पण बच्चू कडू यांनी रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेण्यास नकार दर्शविला आहे. त्यामुळे वेळीच त्यांना आयसीयूमध्ये दाखल केले नाही, तर प्रकृती चिंताजनक होऊन त्यांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो आणि उपोषणस्थळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे बच्चू कडू यांना जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल करण्याची व्यवस्था करावी, असे डॉ. शिवराज माने यांनी त्यांच्या पत्रात नमूद केले आहे.
दरम्यान, काल आंदोलनाच्या सहाव्या दिवशी चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन बच्चू कडू यांच्याशी चर्चा केली. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती गठीत केली जाणार आहे. ही समिती शेतकऱ्यांचे जमीन धारणेनुसार वर्गीकरण करून कर्जमाफी देण्याविषयी अहवाल सादर करणार आहे. त्यानंतर याचा निर्णय घेतला जाईल, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले होते. देशात काल फार मोठी विमान दुर्घटना घडली. राष्ट्रीय शोक व्यक्त केला जात असताना आंदोलन स्थगित करावे, अशी आपली विनंती असल्याचे बावनकुळे म्हणाले होते. मात्र, बच्चू कडू यांनी उपोषण मागे घेण्यास नकार दर्शवला आहे. कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून आंदोलनाची पुढील दिशा ठरवू, असे बच्चू कडू यांचे म्हणणे आहे.