भंडारा : शेजार धर्माला काळिमा फासणारी संतापजनक घटना काल रात्री शहरातील एका सोसायटीत घडली. एका वकिलाने त्याच्या मुलीला खेळायला बोलवायला आलेल्या शेजारच्या एका ११ वर्षीय मुलीला खोटे बोलून घरात घेतले आणि तिच्यावर अत्याचार केला. त्याप्रकरणी भंडारा पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचारासह पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करत पोलिसांनी नराधमाला तासाभरातच बेड्या ठोकल्यात. विजय रेहपाडे असे अटक करण्यात आलेल्या नराधमाचे नाव असून तो व्यवसायाने वकील आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पीडितेच्या आईंच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आई आणि १३ वर्षीय भावासोबत राहते. पीडित मुलीचे वडील शासकीय नोकरीत असून ते नोकरीनिमित्त दुसऱ्या ठिकाणी राहतात. पीडिता आणि आरोपी विजय रेहपाडे याची मुलगी समवयस्क असल्याने दोघींमध्ये मैत्री झाली. मागील काही महिन्यांपासून दोघींचे एकमेकींच्या घरी येणे-जाणे आहे. दोघीही सोसायटीचे परीसरात सोबत खेळत असतात.

घटनेच्या दिवशी दिनांक ३ मार्च रोजी पीडिता रोजच्याप्रमाणे सायंकाळच्या सुमारास सोसायटी परिसरात खेळण्याकरीता गेली. मात्र अर्धा तासातच ती घरी रडत रडत परत आली. त्यावेळी आईने “ती का रडत आहे ? ” असे विचारले. मात्र तिचे रडणे थांबत नसल्याने आईने तिला बेडरुममध्ये नेले आणि रडण्याचे कारण विचारले. त्यावेळी पीडित अल्पवयीन मुलीने आईला आपबिती सांगितली.

पीडित मुलीने आईला सांगितले की, ती खेळण्याकरीता सोसायटी परिसरात गेली मात्र तिथे तिला तिची मैत्रीण दिसली नाही. त्यामुळे ती तिच्या मैत्रिणीला बोलाविण्याकरीता घरी गेली. त्यावेळी फ्लॅटचे दार मैत्रिणीचे वडील आरोपी विजय रेहपाडे याने उघडले. पीडीतेने तिची मैत्रीण घरी आहे का? अशी विचारणा केली असता आरोपी विजय रेडपाडे याने घरात खेळत आहे असे खोटे बोलून पीडित मुलीला घरात घेतले आणि बेडरुममध्ये जाण्यास सांगितले. त्यानंतर घरी कुणीही नसल्याचा फायदा घेत विजय रेडपाडे या नराधमाने त्या अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग केला. तिने त्याला प्रतिरोध केला मात्र वासनांध नराधमाने तिला सोडले नाही. अखेर तिने त्याच्या तावडीतून कशीबशी स्वतःची सुटका करून घेतली. त्यानंतर ती रडत रडत घरी आली आणि आईला रेहपाडे याने केलेल्या दुष्कृत्याचे कथन केले. आईने ताबडतोब पोलीस ठाणे गाठले आणि विजय रेहपाडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली.

कायद्याच्या आधारे लोकांना विविध प्रकरणातून सुटका करून देणाऱ्या या वकिलाला कायद्याचे भान राहिले नाही आणि त्याने स्वतःच्या मुलीच्या वयाच्या चिमुकलीला वासनेची शिकार केले. या घटनेमुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली असून वकिली पेशाला काळिमा फासणाऱ्या या नराधमाला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली जात आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In bhandara lawyer raped 11 year old girl ksn 82 css