भंडारा : बोगस शेतकरी दाखवून बोनसची रक्कम उचल करण्यात आली तसेच बोगस सातबारा तयार करुन शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. लाखनी तालुक्यातील पिंपळगाव/सडक येथील दि. सहकारी संस्था पिंपळगाव यांनी लाखो रुपयाचा घोटाळा केल्याचे उघड झाले आहे.   

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दि सहकारी संस्था पिंपळगाव/सडक ‘अ’ गटातील धान खरेदी केंद्र आहे. खरीप २०२३-२४ हंगामात शासनाने सरसकट हेक्टरी २० हजार रुपये धानाला बोनस जाहीर केला. ज्या शेतकऱ्यांनी सातबारा ऑनलाईन केला अशा सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले. मात्र,पिंपळगाव/सडक येथील धान खरेदी केंद्रावर जे शेतकरीच नाहीत अशा नागरिकांचे बोगस सातबारा काढून ऑनलाइन करण्यात आले. त्या बोगस शेतकऱ्यांच्या नावावर बोनसची रक्कम सुद्धा जमा झाली.

हेही वाचा : विदर्भात मोसमी पाऊस केव्‍हा दाखल होणार? हवामान तज्‍ज्ञांनी सांगितले…

एकट्या पिंपळगाव/सडक धान खरेदी केंद्रावर २५ बोगस शेतकरी आढळून आले आहेत. या विषयी दि सहकारी संस्था यांना विचारले असताना त्यांनी सांगितले की, हे सातबारे डाटा ऑपरेटर यांनी ऑनलाईन केले.ते त्यांनी कसे केले? हे माहिती नाही. त्यांच्याकडून पैसे वसूल केले जाणार आहेत अशी माहिती दिली. या घोटाळ्यात कोणकोण समाविष्ट आहेत हे सखोल चौकशी अंती समोर येईल.

महत्त्वाची बाब ही आहे की, ज्यांच्या नावाने बोनसची रक्कम उचललेली आहे त्यांच्याकडे शेतीच नाही. मग त्यांचे सातबारे तयार झालेच कसे? तलाठ्यांनी सुद्धा सातबारा दिला नाही.पण डूप्लिकेट सातबारे आलेच कुठून? हा संशोधनाचा विषय आहे. वेगवेगळ्या गावातील अनेक शेतकऱ्यांच्या नावांनी पैशाची उचल झाली आहे. हा प्रकार पिंपळगाव आधारभूत धान खरेदी केंद्रावर उघड झाला असून चौकशी केली तर जिल्हाभर असा प्रकार आढळून शकतो असेही सांगितले जात आहे. मात्र या प्रकरणी अद्यापही कारवाई करण्यात आली नाही. जिल्हा पणन अधिकारी यावर काय कारवाई करतात याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा : ‘हर घर नल, हर घर जल’ची प्रतीक्षाच! जलजीवन योजनेवर १९८ कोटी खर्च

जिल्हा पणन अधिकारी यांना माहिती मिळाली पण आपल्याला कोणीही तक्रार केली नाही. त्यामुळे कारवाई कशी करणार असे उत्तर त्यांनी दिले असल्याची विश्वसनीय माहिती आहे. पण शासनाच्या डोळ्यात धूळ घालून हा घोटाळा करण्यात आल्याचे बोलले जात आहे.घोटाळेबाजांना अभय कोणाचे आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तेव्हा यंत्रणेलाचा हाताशी घेऊन बोगस शेतकरी दाखवून शासनाला लुटण्याचा प्रकार तर नाही ना? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

धान खरेदी संस्थेमध्ये कार्यरत दोन संगणक ऑपरेटर यांनी संगनमत करून शेती नसलेल्या बोगस शेतकऱ्यांचे बोगस साताबारे ऑनलाईन केले.तसेच काही शेतकऱ्यांची शेतजमीन ऑनलाईन पोर्टलवर वाढवून शासनाच्या बोनसची ६ लक्ष रुपये रक्कम हडप केली.

हेही वाचा : वर्धा : वन्यजीव निरीक्षणावेळी मचाणीवरच मिळणार भोजन, ‘ही’ खबरदारी घ्या

हा प्रकार उघड झाल्यानंतर त्यांनी हडप केलेली रक्कम संस्थेच्या बँक खात्यात जमा केली. २१ मे रोजी झालेल्या संस्थेच्या मासिक सभेत दोन्ही ऑपरेटर यांना कामावरून कमी करण्याचा ठराव संमत करण्यात आला आहे. या संपुर्ण घोटाळ्याची माहिती जिल्हा पणन अधिकारी यांना देण्यात आली आहे, अशी माहिती व्यवस्थापक दिलीप बुरडे यांनी दिली.

दरम्यान, मोगरा येथील योगराज आत्माराम तागडे, नेपाल योगराज तागडे, गीता योगराज तागडे, सोपान पतीराम वणवे, दिपाली सोपान वणवे, संदीप चिंतामण राऊत सगळेही मोगरा येथील रहिवासी असून, यांचेकडे कुठलीही शेतजमीन नाही. शेती नसल्यामुळे आमच्या रेकॉर्डला कार्यालयात त्यांचा नावाचा सातबारा उपलब्ध नाही, असे शिवणीचे तलाठी योगराज बाबुराव डांबरे यांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In bhandara non farmers also received paddy bonus money from the state government scam of rupees 6 lakhs ksn 82 css